
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात अक्षरशः टिकेची झोड उठविण्यात आली. जून ते ऑक्टोबर या अवघ्या पाच महिन्यात जवळपास दीड लाख बोगस ट्विटर अकांऊट्स उघडून त्याद्वारे सरकार आणि पोलिसांची बदनामी करणाऱ्या पोस्ट, ट्विट्स, रिट्विस, कमेन्ट्स मोठय़ा प्रमाणात करण्यात आल्या. पण मुंबई पोलिसांनी ही बोगसगिरी करणाऱ्यांना आपल्या रडारवर आणल्यानंतर त्यांची चांगलीच टरकली आहे. त्यातील अनेक ट्विटर अकांऊंट्स आता गायब होऊ लागली असून बदनामीकारक मेसेज, ट्विट डिलिट होण्यास सुरुवात झाली आहेत.
14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर ट्विटरवर बोगस अंकाऊंट्सला अक्षरशः पेव फुटले. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत ट्विटरवर जवळपास दीड लाख बोगस ट्विटर खाती खोलण्यात आली आणि मग त्या बोगस खात्यांवरून राज्य सरकार, मुंबई पोलीस व पोलीस आयुक्तांविरोधात बदनामी, मानहानी करणारे मेसेज, ट्विट, रिट्विट आणि पोस्ट करण्यास सुरुवात झाली. नागरिकांमध्ये सरकार आणि पोलिसांची जितकी बदनामी करता येईल तितका प्रयत्न या बोगस ट्विटर अकांऊटंच्या माध्यमातून या पाच महिन्यात करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ञांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्या बोगस ट्विटर खात्यांची पाळेमुळे खणण्यास सुरुवात करताच अनेक बोगस ट्विटर खाती गायब होण्यास तसेच वादग्रस्त बदनामी करणारे पोस्ट, मेसेज डिलिट होण्यास सुरुवात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चीन, नेपाळ, पनामा, हाँगकाँगमधून टिवटिव
मुंबई पोलिसांच्या रडारवर आलेली ही दीड लाख संशयास्पद बोगस ट्विटर अकांऊंट्स चीन, नेपाळ, पनामा, हाँगकाँग आदी देशात खोलल्याचे समोर आले आहे. या देशांमधून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि पोलीस आयुक्तांविरोधात बदनामी करणारे ट्विट, मेसेज, पोस्ट आणि रिट्विट केल्याचे उघडकीस आले आहे.
नामांकित व्यक्तींच्या नावे बोगस अकाऊंट्स
राज्य सरकार आणि पोलिसांची बदनामी करण्यासाठी ट्विटरवर बोगस अकाउंट्स उघडण्यासाठी नामांकित व्यक्तींच्या नावाचा आधार घेतल्याचे देखील तपासात समोर आले आहे. पोलीस आयुक्तांविरोधात खोटी टिका करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या नावाने बोगस ट्विटर अकाऊंट खोलण्यात आले होते, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
बॉट्सचा मोठा वापर
खोटे व बदनामी करणारे ट्विट, मेसेज, पोस्ट करण्यासाठी ट्विटरवर बॉटचा मोठय़ा प्रमाणात म्हणजेच जवळपास 80 टक्के वापर करण्यात आला होता. ट्विटर बॉट हे बॉट सॉफ्टवेअर असून ते ट्विटर ऑल्पिकेशनच्या माध्यमातून ट्विटर अकांऊंटला पंट्रोल करते. बॉट सॉफ्टवेअर पद्धतशीरपणे रिट्विटिंग, लायपिंग, फॉलोव्हिंग, अनफॉलोव्हिंग किंवा अन्य खात्यांवर थेट मेसेज करण्याचे काम करते.


























































