मोदी सरकारला ईद मुबारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

रमजान महिन्यात एकतर्फी शस्त्रसंधी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ‘ ईद मुबारक’ करताना कश्मीर खोऱ्यात भयंकर हिंसाचार भडकला. ईदच्या नमाजानंतर श्रीनगर, अनंतनागसह अनेक ठिकाणी हजारो माथेफिरूंचा जमाव पाकिस्तानी झेंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरला आणि हिंदुस्थानविरुद्ध नारेबाजी केली. लष्करी जवानांवर तुफानी दगडफेक केली, ग्रेनेडचा हल्ला केला. ईदच्या हिंसाचारात एक तरुण ठार आणि ५० वर जखमी झाले आहेत. यात १० जवान जखमी आहेत. दरम्यान, सीमेवर ईदच्या दिवशीही पाकडय़ांची खुमखुमी कायम आहे. पाक सैन्याच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला.

मिठाई वाटप नाही

पाकडय़ांकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने यावेळी मिठाईचे वाटप झाले नाही. ईदच्या दिवशी आटारी-वाघा सीमेवर बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान मिठाईची देवाणघेवाण होते. मात्र पाकडय़ांच्या कुरापतीमुळे बीएसएफने यावर्षी मिठाईची देवाणघेवाण केली नाही.

शस्त्रसंधी आता तरी मागे घेणार का?

रमजानमध्ये जारी केलेल्या एकतर्फी शस्त्रसंधीचा निर्णय अंगलट आला आहे. ईदच्या दिवशीही कश्मीर खोरे पेटले आणि सीमेवर पाकडय़ांचा गोळीबार सुरू आहे. त्यामुळे ही शस्त्रसंधी आतातरी मोदी सरकारकडून मागे घेतली जाते का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

पाकडय़ांचा गोळीबार; जवान शहीद

रमजानमध्ये २६ दिवसांत २५ दिवस सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकडय़ांनी ईदच्या दिवशीही नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यात अवघ्या २१ वर्षांचा जवान बिकास गुरुंग हा शहीद झाला. मणिपूर येथील  हा जवान आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला बीएसएफकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात गेल्या पाच दिवसांत आठ जवान शहीद झाले आहेत.