मोनेगिरी – । वक्रतुंड माने साटम।

>> संजय मोने

पश्चिम महाराष्ट्रातल्या धनाढ्य घरातला एकुलता एक मुलगा. तोंडात सोन्याचा चमचा. आई समाजकारणात होती, वडील राजकारणात होते, पण याने त्यांच्यातला कुठलाही गुण उचलला नाही. दिसायला देखणा असूनही त्याला `वक्रतुंड’ असं टोपणनाव पडलं. याचं कारण, त्याच्या जिभेला असलेली वळणं.

त्याचं नाव वक्रतुंड नाही, चांगलं अजय माने-साटम नाव घेऊन तो जन्माला आला. पश्चिम महाराष्ट्रातल्या धनाढ्य घरातला एकुलता एक मुलगा. तोंडात सोन्याचा चमचा. आई समाजकारणात होती, वडील राजकारणात होते, पण याने त्यांच्यातला कुठलाही गुण उचलला नाही. काहीही न करता उत्तम आयुष्य घालवता येईल इतके पैसे त्याच्या नावावर ठेवलेले होते.

“च्यायला! काहीही न करता जर आरामात जगता येत असेल तर का नाही जगायचं?” हे त्याच्या आयुष्याचं ध्येय होतं. दिवसभर तो फिरत असायचा त्याच्या गावात. त्याचा मेंदू सरळ होता. फक्त जिभेला फार वळणं होती. त्यामुळेच दिसायला देखणा असूनही त्याला `वक्रतुंड’ असं टोपणनाव पडलं होतं.

असाच एकदा एका ठिकाणी तो बसला होता. म्हणजे साधारण सगळी सकाळ आणि थोडी संध्याकाळ तो तिथेच असायचा. एका उपाहारगृहात. कोपऱ्यातल्या टेबलावर. असंख्य चहा आणि भजी, वडे उसळ आणि मिसळ फस्त व्हायच्या. कोण कोण येऊन खाऊन जायचे त्याचा हिशेब नसायचा. 1995च्या आसपास त्याचं रोजचं बिल पाचशे-सहाशे असायचं. तो इंजिनीअर होता, पण पदवीच्या कागदावर लिहिलं होतं म्हणून. तसा तो मुंबईला यायचा महिन्यातून एक-दोन वेळेला. कुठल्या तरी कंपनीत तो सल्लागार म्हणून काहीतरी काम करायचा आणि पंचवीस-तीस हजार रुपये घेऊन यायचा. घरच्यांच्या पैशाला त्याने कधी हातही लावला नाही. फिरता फिरता गावात भेटलेल्या माणसांसमोर तो आपली जीभ चालवायचा.
“अहो! मेजर दाभाडेचं घर कुठे आहे हो?” असा प्रश्न एकाने विचारला.
“मायनर नाही म्हणून मेजर म्हणायचं हो. काय काम आहे तुमचं?”
“खासगी आहे. तुम्हाला का म्हणून सांगू?”
“सांगू नका हो! खासगी ठेवा तुमच्याकडेच, पण त्यांचा पोरगा लग्नाचा आहे आणि तुमचा चेहरा एका मुलीच्या बापासारखा दिसतोय म्हणून विचारलं.”
“तुम्हाला काय माहीत, मी मुलीचा बाप आहे?”
“अहो! नसतं तसं तर इथून चालते झाला असता ना?”
“कसा आहे मुलगा? जरा कळालं असतं तर …”
“गावात विहीर आहे का तुमच्या?”
“हो…हो. माझ्या स्वतच्या शेतात तीन विहिरी आहेत.”
“त्यातली प्यायच्या पाण्याची कुठली आहे?”
“त्याचा आणि त्या दाभाडेंच्या स्थळाशी काय संबंध?”
“आहे म्हणून विचारतोय, तर प्यायच्या पाण्याची विहीर सोडून उरलेल्या विहिरीत पोरीला ढकला. दाभाडेंशी सोयरीक करण्यापेक्षा विहिरीच्या तळाशी मुलगी सुखी राहील.”
“तुम्हाला पत्ता विचारला, चूकच झाली.”
“माझ्याहून त्या स्थळाबद्दल बरं कोणीही सांगणार नाही.”

वक्रतुंडने तुकडा तोडला. अजून एक त्याचा लाजवाब किस्सा. झालं असं की, त्याच्या घरच्या कोपऱ्यावर एक असाच घराणेबाज, त्याचा चुलता आमदार होता, पण तो बिचारा नशिबाने आमदार झाला होता. राजकारणातल्या खेळ्या खेळून तथाकथित श्रेष्ठींनी त्याला निवडून दिलं होतं. तीन महिन्यांच्या अथक परिश्रमाने तो सही करू लागला होता, पण वर निर्देशित केलेला त्याचा पुतण्या गावभर मिरवत असायचा. पैसे आणि संपत्तीचा माज त्याच्यात पुरेपूर झिरपला होता. घरात बरीच वाहनांची गर्दी होती. तो त्याला वाटेल तिथे त्या उभ्या करायचा. एकदा अशीच त्याच्या गाडय़ांमुळे वाहतूक अडली होती. शिवाय त्याला वक्रतुंड अजय माने-पाटील इतका मान गावात मिळत नव्हता याचा राग होताच. कोणीतरी त्या वाहनांमुळे झालेल्या कोंडीमुळे निनावी पार केली आणि पोलीस तिथे हजर झाले. आली का पंचाईत? आमदाराच्या नातेसंबंधातील माणसाच्या गाड्या. काय करणार, कशा हटवणार? पोलीस काहीतरी जुजबी मलमपट्टी करून सटकायला बघतच होते. वक्रतुंडने बाजूच्या एका माणसाला पकडले आणि त्याला काय करायचं ते सांगितलं. माणूस पुढे झाला आणि म्हणाला, “इन्स्पेक्टर साहेब! एक सांगायचंय.”
“काय आहे?”
“साहेब! त्या कुठल्या तरी एका गाडीत चोरून आणलेलं चंदन आहे.”
तेव्हा कर्नाटकातून पश्चिम महाराष्ट्रात म्हणे चोरून आणलेलं चंदन पुढे पाठवलं जायचं.
“चंदन! स्मगलिंग केलेलं? तुम्हाला काय माहीत?” “हे बघा!” असं म्हणून त्याने आपल्या हाताचा वास त्या हवालदाराला दिला. गाडी जप्त झाली, पोलीस स्टेशनला जमा झाली.
“पातुंड! तो वास चंदनाचा होता?”
“हो, शंभर टक्के.”
“म्हणजे त्या पोराच्या गाडीत चंदन होतं?”
“मी घरून येताना चंदनाचे अत्तर लावून आलो होतो. मी एक पुडी सोडली. दिला माझ्या हाताचा वास.”

वक्रतुंड आता लग्नाच्या वयाचा झाला होता. त्याच्यासाठी स्थळ बघत होते घरचे, पण तो एका ठिकाणी टिकायला हवा ना! गावातल्या गरजू मुलांना शैक्षणिक मदत करायला तो फिरत असायचा. असाच एका मोठय़ा उद्योजकाकडे तो सकाळी सकाळी जाऊन थडकला.
“अप्पासाहेब! भरपूर पैसा हाय की, तुमच्याकडे. सगळी तुमची पोरं गावात पाण्यासारखा तुमचा पैसा खर्च करत उंडारत असतात. पुढे तुम्ही गेलात…”
“ए! काय बोलतोयस? माझ्या तोंडावर सांगतोस? मी जाणार?”
“आत्ता! काय खोटं बोलतोय का? अप्पासाहेब! जगात सात चिरंजीव आहेत. कोन कोन हायेत तुम्हाला माहीत हायेत का?”
त्या बिचाऱ्या अप्पासाहेबाला त्याच्या वंशाच्या फणसाच्या वृक्षाला लटकलेल्या बीजांची संख्या नेमकी माहीत नव्हती तर सात चिरंजीवांची नावं काय लक्षात असणार? त्याचा वंश वाढत गेला त्याच्यासाठी दोन-तीन स्त्रियांचा हातभार लागला होता. अप्पासाहेब साधारण दहा किलो मूग गिळल्यागत गप्प झाला. पुढे त्या कुठल्या तरी फणसाच्या किंवा फणसांच्या नावाने गरजू मुलांसाठी शिष्यवृत्या जाहीर झाल्या आणि ते फणस नावारूपाला पोचले.
“अजय माने! तुम्ही हे सरळ शब्दात सांगू शकला असतात?” शिष्यवृत्ती प्रदान करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारलं. “साहेब! मटणाची नळी सरळ तोंडाने नाही तोडता येत. वाकडं करायला लागतं थोबाड!” “बरं, मला ते सात चिरंजीव कोण आहेत ते सांगाल का?”
“वाचनालयात जाऊन बघा! मला पन माहीत न्हायी. पन अप्पासाहेबाला माहीत नव्हतं एवढं मला माहीत होतं.”
“एकदा घरी या गप्पा मारायला” तो अधिकारी म्हणाला. अजय माने ऊर्फ वक्रतुंड त्याच्या घरी गेला. “आपण अजय माने ना?” अधिकाऱ्याची मुलगी घरी होती. तिने विचारलं.
“हो, मंग!”
“मला तुमच्याबरोबर संसार करायला आवडेल. तुम्हाला?” “अं…अं…” आयुष्यात पहिल्यांदा पातुंड गांगरला होता.
“तुमच्या काय अटी आहेत?” तिने विचारलं.
“तशा काय फार नाहीत.” अजूनही तो सावरला नव्हता.
“माझ्या बऱ्याच आहेत. पहिलं म्हणजे फालतू तोंड चालवायचं नाही. दुसरं म्हणजे आपल्याला जे उत्तम येतं त्यात लक्ष घालायचं आणि तिसरं म्हणजे माझ्यावर भरपूर प्रेम करायचं.” दोन-तीन महिन्यांत अजय माने ऊर्फ वक्रतुंड याचा विवाह झाला. आताही तो तोंड चालवतो, पण बायकोपुढे गप्प बसल्याने तोंडाचा आकार पा झाला आहे आणि जीभ एकदम सरळ झालेली आहे.
[email protected]