अख्खे गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवायचे! पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील दोन तरुणांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास केला असता त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. सेक्सटॉर्शनच्या रॅकेटचा माग काढत पुणे पोलीस राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील गुरुकोठडी या गावात पोहचले असता हे संपूर्ण गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे.

सेक्सटॉर्शनमुळे पुण्यातील दोन तरुणांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केली. नग्न छायाचित्र आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या दोघांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्याला कंटाळून अखेर दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली. त्याचवेळी पोलिसांनीही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. त्यातून या प्रकरणाचे मूळ राजस्थानात असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.

सेक्सटॉर्शनचे रॅकेट अलवर जिह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुकोठडी येथून चालवले जात असल्याचा माग लागताच पुणे पोलीस तिथे धडकले. यात अन्वर खान हा मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला. आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अडीच किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केला. मात्र, पोलीस मागे हटले नाहीत.

असे चालते सेक्सटॉर्शनचे रॅकेट

आरोपी अन्वर खान याच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या रॅकेटमध्ये एकटा अन्वर नाही तर गावातील सुमारे 2500 जण सामील आहेत. त्यात पुरुषांसह महिलाही सामील आहेत, अशी कबुली अन्वरने दिली. सेक्सटॉर्शन करण्यासाठी आधी बनावट सोशल मीडिया अकाऊंट बनवण्यात येते आणि रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महिलेशी फोनवर बोलण्याचे आमिष दाखवले जाते. यानंतर, व्हिडीओ कॉल करून जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला फोटो शेअर करण्यास सांगितले जाते. हे फोटो मॉर्फ करून टार्गेट केलेल्या व्यक्तीला आक्षेपार्ह अवस्थेत दाखवले जाते आणि नंतर तोच फोटो वा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात, असे तपासात समोर आले आहे.

टीसी, न्यायाधीशही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

पुणे पोलिसांनी अन्वर खानला स्थानिक न्यायालयात हजर केले. तेव्हा तिथल्या न्यायाधीशांनीही धक्कादायक बाब समोर ठेवली. काही न्यायाधीशही या जाळ्यात अडकल्याचे त्यांनी सांगितले. अन्वरची ट्रान्झिट कस्टडी पुणे पोलिसांना मिळाली असून रेल्वे तिकीट काढण्यासाठी पोलीस स्टेशनवर पोहचले असता तिथेही नवी माहिती मिळाली. काही टीसींनाही अशा प्रकारे जाळ्यात अडकवल्याचे सांगण्यात आले. अन्वरला आता पुण्यात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.