
सामना ऑनलाईन । चंदिगड
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ चाललेली दिसत आहे. अशीच एक घटना चंदिगडमध्ये घडल्याचं समोर आली आहे. चंदिगडमध्ये राहणाऱ्या दीड वर्षीय आयुषवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदिगडमध्ये पलसोरा येथील घरकाम करणारी एक महिला आपल्या चार मुलांना एका पार्कमध्ये खेळण्यासाठी सोडून घर काम करण्यासाठी निघून गेली. मुलं खेळत असताना त्यांच्यावर तिथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. हल्ल्याला घाबरलेल्या मुलांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला. तीन मुलं मोठी असल्याने ती पळून जाण्यात यशस्वी ठरली. मात्र, पण आयुष दीड वर्षांचा असल्यानं त्याला तिथून पळ काढता आला नाही आणि तो भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडला.
कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आयुषला सरकारी रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परीसरातल्या लोकांनी जमा होऊन या घटनेचा निषेध केला आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारला. या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या भीतीपोटी त्यांनी आपल्या मुलांना खेळायला पाठवणंही बंद केलं आहे.

























































