अमली पदार्थाविरोधात धडक कारवाई; मध्यरात्री रेल्वेस्थानकाजवळ सापडले ब्राऊन हेरॉईन, तिघेजण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमली पदार्थाची रत्नागिरीत खरेदी-विक्री होत असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.रेल्वेस्थानकाच्या पार्सल गेटवरून पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन इसमांच्या संशयास्पद हालचाली गस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसून आल्या.यातिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 21.78 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अमली सदृश पदार्थ आढळून आला. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी रात्री केली.

मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी – विक्री करत आहेत अशी माहिती मिळत होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी-अंमलदार यांना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे रोज निहाय अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम चालू होते.

शनिवारी रात्री 2.वा. च्या दरम्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलीस अंमलदार हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील पार्सल गेट मधून पार्किंग कडे जाणाऱ्या रोडवर पायी पेट्रोलिंग करीत जात असताना रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे अभिलेखावरील असलेले, माहितगार गुन्हेगार संदिप गोविंद शिवगण रा. धनजीनाका रत्नागिरी, आकीब खालीद काझी रा. गवळीवाडा रत्नागिरी व तौसिफ आसिफ मिरजकर रा. राहुल कॉलनी गवळीवाडा, रत्नागिरी हे तिघे एकत्रीत त्याठिकाणी संशयास्पद हालचाल करत असताना दिसून आल्याने त्यांना जागीच थांबवून त्यांची पंचांचे समक्ष चौकशी व अंग झडती घेण्यात आली. या तीनही संशयीत इसमांच्या झडतीमधून व घटनास्थळी एकूण 21.78 ग्रॅम ब्रााऊन हेरॉईन हा अमली सदृश पदार्थ आढळल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.हि कारवाई पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, प्रसाद घोसाळे, गणेश सावंत,प्रविण बर्गे, अमोल भोसले, आशिष भालेकर, विनय मनवल, रत्नकांत शिंदे, व पंकज पडेलकर यांनी केली.