
दिल्लीमध्ये एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या कोचिंग क्लासमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास क्लास सुरू असताना अचानक बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने सहा विद्यार्थी अडकले होते. यामध्ये दोन विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत.
दिल्लीच्या जुने राजेंद्रनगर येथे हा स्पर्धा परीक्षेचा क्लास आहे. या ठिकाणी अचानक वाढलेल्या पावसाचे पाणी शिरले. यामध्ये सहा विद्यार्थी अडकले होते. दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमने तिघांना बाहेर काढले. मात्र एकाचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मंत्री अतिशी यांनी ‘एक्स’वरून दिली आहे.





















































