
घरचे रोज आठ तास अभ्यास करायला लावत असल्याने विद्यार्थ्याने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास बोरिवली रेल्वे पोलीस करत आहेत. मृत मुलगा हा दिंडोशी येथे राहत होता. तो रोज आठ तास अभ्यास करायचा. तरीदेखील त्याचे घरचे त्याला आणखी वेळ अभ्यास करायला लावत असायचे. अभ्यासाच्या त्रासाला कंटाळून मुलाने बुधवारी एक सुसाईड नोट लिहिली व तो घराबाहेर पडला. सायंकाळी मुलाची आई घरी आली तेव्हा तिला सुसाईड नोट दिसली. तिने याची माहिती दिंडोशी पोलिसांना कळवली. सायंकाळी मुलाने बोरिवली- कांदिवलीदरम्यान लोकल समोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती समजताच बोरिवली रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी मुलाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवला. त्या मुलाची ओळख पटवण्याचे काम सुरू असतानाच त्याचे कुटुंबीय बोरिवली रेल्वे स्थानकात आले. ओळख पटल्यानंतर मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.


























































