
सामना प्रतिनिधी । घोटी
निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने व सोयीसुविधा नसल्याच्या निषेधार्थ इगतपुरीतील भावली येथील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्तांना घेराव घातला. सर्व समस्या सोडविण्याचे व चौकशी करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
इगतपुरीतील भावली येथील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण वेळेवर मिळत नव्हते. मिळणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे होते, तसेच इतर सुविधाही मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. मागील आठवडय़ात यासंदर्भात विद्यार्थ्यांनी सहा किलोमीटरपर्यंत पायपीट करीत आदिवासी विकासच्या आयुक्तांची भेट घेण्यासाठी महामार्ग गाठला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी त्यांना समजावून शाळेत पाठविले होते. यानंतर आठवडा उलटूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आज विद्यार्थी आक्रमक झाले. शेकडो विद्यार्थी पुन्हा सहा किलोमीटरची पायपीट करीत पिंप्री येथील विश्रामगृहापर्यंत पोहचले. ते नाशिकला पायी निघाले होते, याची कुणकूण पोलिसांना लागताच पोलिसांनी त्यांना अडविले व समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आदिवासी विकासचे उपायुक्त लाभेश सलामे यांना तेथे बोलविण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासह सुनील जगताप, युवराज गोरे या अधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.






























































