
नगर जिह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. पांढरीचा पूल, नेवासा एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सुभाष देसाई यांच्या हस्ते व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत घोडेगाव ते सोनई या आठ किलोमीटरच्या रस्तेकामाचे भूमिपूजन शुक्रवारी घोडेगाव येथील शनीचौकात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. कोरोना नियमांचे पालन करत कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. दरम्यान, घोडेगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन झाल्यावर सोनई येथील मुळा शैक्षणिक संस्थेच्या आमराई विश्रामगृहात नगर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांची शिवसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
सुभाष देसाई म्हणाले, जिह्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख सातत्याने प्रयत्नशील असतात. विकासकामे होत असताना ती गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी गडाख स्वतः लक्ष ठेवून काम करतात. त्यामुळे विकासकामे टिकणारी व लोकोपयोगी स्वरूपाची होणार आहेत. यापुढेही संपूर्ण राज्य शासनाच्या माध्यमातून नेवासा तालुक्याला भरघोस निधी देणार आहोत. मंत्री गडाख यांनी कोरोनाच्या काळातही मोठय़ा प्रमाणावर निधी मिळवून कामे सुरू ठेवली आहेत. यातून नेवासा तालुक्याचा कायापालट होणार आहे. पांढरीचा पूल, नेवासा एमआयडीसीत नवीन उद्योग व्यवसाय यावेत, अशी मागणी गडाख यांनी केली आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लावून पांढरीचा पूल, नेवासा एमआयडीसीच्या विकासासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.
मंत्री गडाख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना लोकोपयोगी कामे करता येतात. नेवासा तालुक्याच्या विकासकामांत मंत्री सुभाष देसाई यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. पुढील काळात पांढरीचा पूल नेवासा एमआयडीसीचा कायापालट करून नवीन उद्योग व्यवसाय आणून तालुक्याच्या विकासात हातभार लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.






























































