युद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का? भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा सवाल

subramanian-swamy

हिंदुस्थान-चीन सीमाप्रश्नाबाबत भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीमेवरील परिस्थिती जैसे थे करण्यासाठी युद्धच पर्याय असून हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का, असा थेट सवालच त्यांनी मोदी सरकारला केला आहे.

पूर्व लडाखमध्ये हिंदुस्थान-चीन सैन्य आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू असून चर्चेतून शांततापूर्ण तोडगा काढण्यावर मंथन सुरू आहे. त्यातच सीमेवरील तणावाबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षावर श्वेतपत्रिका काढण्यास काय अडचण आहे? पण सध्याची जी स्थिती आहे ती नवीन परिस्थिती तयार होण्याच्या दिशेने जात आहे. केवळ युद्धच योग्य पद्धतीने परिस्थिती सुधारू शकते. त्यासाठी हिंदुस्थान तयार आहे का, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गलवान व्हॅलीत चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील परिस्थितीसंदर्भात निवेदन करताना 38 हजार चौरस किमी भूप्रदेशावर चीनने कब्जा केल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या