बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयामुळे गावसकर धोनी व धवनवर भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर महेंद्रसिंह धोनी आणि शिखर धवनवर चांगलेच भडकले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकाला अवघे सहा महिने बाकी असताना बीसीसीआयने शिखर धवन आणि महेंद्रसिंह धोनीला स्थानिक स्पर्धांमधून न खेळण्याची परवानगी दिली आहे. गावसकर यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे.

‘इंडिया टुडे’शी बोलताना गावसकर म्हणाले की, ‘धवन आणि धोनी यांना तुम्ही स्थानिक क्रिकेट का खेळत नाही हा प्रश्न विचारायला हवा. तसेच बीसीसीआय आणि निवडसमितीला देखील विचारावे लागेल की देशाकडून खेळत नसतानाही खेळाडूंना स्थानिक क्रिकेट न खेळण्याची परवानगी कशी दिली.’ सध्या धवन मेलबर्नमध्ये कुटुंबासोबत मजा लुटत आहे तर धोनीने नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर क्रिकेट खेळलेले नाही. धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्याच्याकडे मोकळा वेळ असतानाही बीसीसाआयने त्याला व धवनला स्थानिक क्रिकेट न खेळण्याची परवानगी दिली.

गावसकर पुढे म्हणाले की, ‘धोनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार नाही. याआधी धोनी फक्त एक दिवसीय क्रिकेट खेळत असून कसोटीतून निवृत्त झाल्याने त्याच्याकडे मोकळा वेळ आहे. धोनीने आपला शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला विंडीजविरुद्ध खेळला होता आणि पुढील सामना जानेवारीत खेळणार आहे. या काळात त्याने स्थानिक क्रिकेट खेळायला हवे होते, यामुळे त्याच्या विश्वचषकातील निवडीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.’ तसेच वयाबरोबर खेळातही बदल होतो, जर तुम्ही स्थानिक क्रिकेट खेळत राहिला तर तुमची क्रिकेटमधील कारकीर्द वाढवण्यासाठी मदत होऊ शकते, असेही गावसकर म्हणाले.