मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे यांची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील सुनील बाबुराव कावळे (40) यांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई येथे आज 19 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी लिहून त्यांनी जीवन संपविले.

सुनील कावळे हे संभाजीनगर येथे एका बिल्डरकडे चालक म्हणून काम करत होते. 18 ऑक्टोबर रोजी आंदोलनासाठी मुंबई येथे गेले असता त्यांनी बुधवारी मध्यरात्री 12.45 वाजता स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून व गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर सुसाईड नोट पाठवून त्यात ‘मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणीही शांत बसू नये आणि कोणीही काहीही बोललं तरी त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका. या इथं, या इथं, या इथं, मुंबईमध्ये उपोषणास बसू व मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणीही शांत बसू नका…’ असे लिहून ठेवले आहे.

सुनील कावळे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिकनगावातील ग्रामस्थ सरकारचा निषेध करत ‘हे सरकार किती मराठा युवकांचा बळी घेणार?’ असा प्रश्न विचारत आहेत. सुनील बाबुराव कावळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई -वडील, भाऊ असा परिवार आहे.