UBER आणणार मुंबईतील पहिली जलद बोट सेवा; गेट वे ते मांडवा 20 मिनिटांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या इतकी वाढत चालली आहे की 20 मिनिटांच्या प्रवासाला एक ते दीड तास लागतो. लोकल, बेस्ट खचाखच भरून वाहतात, तर खासगी वाहनाने जायची सोय नाही. पण आता हा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. कारण महानगरात कॅब सेवा देणारी उबर ही कंपनी मुंबईतील पहिली अतिशय वेगवान बोटसेवा सुरू करणार असून गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेटी हे अंतर केवळ 20 मिनिटांत कापता येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून या बोटसेवेला सुरुवात होणार आहे. याबाबतची घोषणा आज उबरने केली.

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेटी हे अंतर 19 किलोमीटर आहे. रस्त्याने हे अंतर कापायचे झाल्यास तब्बल साडेतीन तास लागतात. या बोटीची क्षमता सहा ते आठ प्रवाशांची आहे. मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने ही बोटसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकारक व्हावा यासाठी ही बोटसेवा सुरू करण्यात येणार असून त्याची आम्हाला प्रचंड उत्सुकता लागून राहिल्याचे उबर इंडियाचे प्रमुख प्रभात सिंग यांनी सांगितले. तर ही मुंबईतली जलद बोटसेवा ठरणार असून मुंबईकरांचा प्रवासात जाणारा मौल्यवान वेळ वाचण्यास मदत होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल असे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले.

या ठिकाणाहून सुरू होईल सेवा

  • गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटा आणि मांडवा जेट्टी
  • अंतर 19 कि. मी.
  • स्पीडबोटीने प्रवास वेळ 20 ते 22 मिनिटे
  • फेरी बोटीने- 1 तास, रस्त्याने साडेतीन तास
  • प्रवासी क्षमता- 6 ते 10
  • 6 ते 8 प्रवासी क्षमता असलेल्या बोटीचे प्रवासी भाडे 5700 रुपये
  • 10 प्रवासी क्षमता; बोटीचे प्रवासी भाडे 9500 रु.
  • सुरक्षेच्या दृष्टीने लाइफ जॅकेट तसेच इतर साहित्य उपलब्ध असेल.
  • प्रवास सुरू करण्याच्या 15 मिनिटे आधी तिकीट बुक करता येईल.