
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनकर्त्या खेळाडूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनाही तपासावरून फटकारलं आहे.
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्या विरोधात महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह सहाजणांनी 24 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण यांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करून त्यांना अटक करा, तुरुंगात टाका. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा मागण्या याचिकेत केल्या गेल्या होत्या. मागील सुनावणी वेळी सिंह यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले होते.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा या याचिकेवर सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात याचिका दाखल करणं हाच या याचिकेचा हेतू असल्याचं याचिकाकर्त्यांना स्पष्ट केलं.
याचिकाकर्त्या कुस्तीपटूंतर्फे युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की, त्यांना आता काय हवं आहे. तुमचा असा युक्तिवाद होता की तक्रार दाखल केली जात नाही. आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याखेरीज तक्रारदार कुस्तीपटूंना संरक्षण देण्याचे आदेशही आम्ही जारी केले आहेत. दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनीही या खेळाडूंना सुरक्षा पुरवण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढत असल्याचं म्हणत आता या प्रकरणावर दंडाधिकारी किंवा उच्च न्यायालय यांपैकी कुठल्याही कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होऊ शकते. याचिकाकर्ते खेळाडू या न्यायालयांकडे जाण्यास स्वतंत्र आहेत, असं म्हणत याचिका निकाली काढली.
तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावले. याचिकाकर्त्या सर्व पीडितांचे जबाब का नोंदवले नाहीत? त्यांचे जबाब दंडाधिकाऱ्यासमोर कधी नोंदवले जातील, असे प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारले.

























































