
शिवसेनेची मालमत्ता शिंदे गटाला देण्यात यावी अशी मागणी करणाऱया वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. तुम्ही कोण? तुमचा या मालमत्तेशी संबंधच काय? अशी विचारणा करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिकाच फेटाळून लावली.
शिवसेना भवन आणि पक्ष निधी एकनाथ शिंदे गटाला देण्यात यावा अशी याचिका अॅड. आशीष गिरी यांनी 10 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे, असे गिरी यांनी याचिका दाखल करताना म्हटले होते.
आज या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गिरी यांना चांगलेच फैलावर घेतले. ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण? तुमचा या मालमत्तेशी संबंध काय? असा सवाल करत सरन्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली.

























































