
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या पत्नी लता यांची सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी काढली आहे. एका कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याबद्दल न्यायालयाने लता यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कर्जाची रक्कम तुम्ही परत का केली नाही, ती केव्हा करणार आहात असा प्रश्न लता रजनीकांत यांना सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.
प्रकरण नेमकं काय आहे ?
कोचादियान या चित्रपटाच्या निर्मितीसाठी लता रजनीकांत संचालक असलेल्या मिडीया वन ग्लोबल एंटरटेनमेंट या कंपनीने कर्ज घेतलं होतं. अॅड ब्युरो एडव्हर्टायझिंग या कंपनीकडून मिडीया वन ग्लोबल एंटरटेनमेंटने १४.९० कोटींचं कर्ज घेतलं होतं. ज्यातील ६.२० कोटींच्या कर्जाची परतफेड करणं अद्याप बाकी आहे. मिडीया वन ग्लोबल एंटरटेनमेंटने हे कर्ज तीन महिन्यात परत करावं अन्यथा ते लता रजनीकांत यांना भरावं लागेल असे आदेश फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने आणि दिलेल्या आदेशाप्रमाणे लता रजनीकांत यांनीही कर्जाची रक्कम परत न केल्याने न्यायालय संतापलं आहे. न्यायालयाने लता रजनीकांत यांना ही रक्कम केव्हा भरणार अशी विचारणा केली आहे, त्यावर त्यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं हे पुढच्या सुनावणीच्यावेळीस कळू शकेल.























































