
सामना प्रतिनिधी । मुंबई
गोरेगाव पूर्वेकडील नागरी निवारा येथील डोंगरावर लागलेली आग तब्बल 14 तासांनी आज सकाळी साडेआठ वाजता विझली. मात्र या आरेच्या आगीतून आता संशयाचे वारे वाहू लागले आहेत. ही आग लागली नसून बिल्डरांनीच लावली असल्याचाआरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. या आरोपाला वन अधिकारी व पर्यावरणप्रेमी संस्थांनीही दुजोरा दिला आहे. आरे येथील डोंगर पोखरून इमारती उभ्या करण्यासाठी आग लावण्यात आली असल्याचा आरोप वन्यप्रेमींनी केला आहे.
आरेच्या जंगलात नागरी निवारा, आयटी पार्क येथील डोंगरावर सोमवारी सायंकाळी लागलेली आग तब्बल 14 तासांनंतर आज सकाळी पूर्ण विझल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात आले. या आगीच्या राखेतून संशयाचा धूर निघू लागला आहे. ही लाग लागली नसून जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केल्यानंतर त्याला वन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. आग ज्या 30 ते 40 एकर भागात लागली तो भाग खासगी मालकीचा आहे. त्यामुळे स्पष्ट विधान करणेही वनधिकाऱ्यांनी टाळले आहे, मात्र संशयाचा धूर कायम राहिला आहे. ही जागा खासगी मालकीची असून त्याचा विकास करून तिथे रहिवासी इमारत बांधण्यात येणार आहे. सन 1980 पासून या जागेवर कंपाऊंड बांधण्यात आले आहे. त्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलालाही अडचणी आल्या. येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा वावर असतो. संध्याकाळच्या वेळी नाल्यावरून थेट कंपाऊंडवरून उडय़ा मारून समाजकंटक या जागेचा वापर करतात. अडीच ते तीन फूट उंच गवताने वेढलेली ही जागा होती. सुकलेले गवत असल्याने आग क्षणात भडकली. आग कशी लागली याचा चौकशी सुरू असून खरे काय ते बाहेर येईल असे एका अधिकाऱयाने सांगितले.
डोंगर पोखरून इमारती उभ्या करण्यासाठी आग लावण्यात आली
ही खासगी मालकीची जागा आहे. येथे झाडांची रोपे, वनस्पती वाढू नये हा संबंधितांचा प्रयत्न होता. डोंगर पोखरून तेथे इमारती उभ्या करण्यात येणार आहेत. येथून ओशिवरा नदी उगम पावते व संपूर्ण वनपट्टा असल्याने या जागेवर इमारती उभ्या करता येणार नाही. आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपूर्वी तक्रारही केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. डोंगर पोखरून तेथे इमारती उभ्या करण्यासाठीच आग लावण्यात आली असल्याचा आरोप वनशक्ती या संस्थेने केला आहे.
पर्यावरण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश
ही आग हा एक अपघात होता की पूर्वनियोजित होती याची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या जंगलात लागलेल्या आगीत 60 एकरांतील झाडे भस्मसात झाली. यासंदर्भात वन विभागाने चौकशी करायला हवी. यासंदर्भात आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांनाही यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगीच्या चौकशीचा अहवाल तयार करण्यास सांगितला असून येत्या आठवडाभरात हा अहवाल येईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे रामदास कदम म्हणाले.

























































