
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. सध्याच्या सरकारमध्ये, सत्तेत काहीही उरलेले नाही. सरकारमधून बाहेर पडा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देऊ. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. त्यांनी आता मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या असून अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.
राजू शेट्टी यांच्या आवाहनानंतर बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर काही कयासही राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. त्यातच आता त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार यांना निदान शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणतरी आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून अनेक तर्क लढवण्यात येत आहे.
ऊसाचा मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही. तर यंदाचा ऊस गळीत हंगामा सुरू करून देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तसेच कारखान्यात वजन काटे डिजिटल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या यात्रेत राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे.

























































