
सामना ऑनलाईन । पालघर
बोईसर नवापुर नाका योथील जिल्हा परिषदेच्या गुजराती शाळेत विध्यार्थ्यांना चक्क शाळेच्या छतावर चढवून विस्कटलेली कौलं नीट कराला लावली. त्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पत्र्यावर चढवुन एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे समोर आले आहे. सध्या पाऊस सुरु आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी गळती होत आहे. मात्र यावर उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वीच शाळांची डागडुजी करणं अपेक्षित असते. त्यासाठी शाळांना निधी देखील दिला जातो. मात्र या शाळेतील शिक्षकांना आता शहाणपणा सूचला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही सुरक्षे शिवाय छतावर पाठवलं.
सध्या पालघरमध्ये शाळेच्या छतावर चढलेल्या विध्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. यासंबंधी पालघर जिल्हा परिषेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाल यांच्याकडे विचारणा केली असता, याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल असं मोघम उत्तर मिळालं. मात्र अशाप्रकारे शाळांच्या मनमानीला पाठीशी घालण्याचे हे पहिलेच उदाहरण नाही, या आधी ६ चाकी स्कूल बस चक्क ५ टायर वर धावत असल्याचे समोर आले. ही बाब गंभीर असूनही शिक्षण अधिकारी कंकाल यांनी थातुर मातुर कारवाई केल्याच समोर आल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणार्या पालघरमधील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कधी सुधारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























































