
कधी तुकाराम महाराजांवरील वक्तव्यामुळे तर कधी साईबाबांवर केलेल्या विधानामुळे वाद ओढवून घेणारे बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमंत कथेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव यांनी एक खळबळजनक इशारा दिला आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथील नौबतपूर येथे 13 मे ते 17 मे या दरम्यान बागेश्वर बाबाची हनुमंत कथा होणार आहे. त्या कार्यक्रमाचा तीव्र विरोध तेजप्रताप यांनी केला आहे. हा कार्यक्रम होऊ नये आपल्याकडे बागेश्वर धामच्या वादाशी निगडीत एक जुना व्हिडीओ असून तो लवकरच व्हायरल करणार असल्याचा इशारा तेजप्रताप यादव यांनी दिला आहे. बागेश्वर बाबा हा अतिशय भित्रा असल्याचंही तेजप्रताप यांनी म्हटलं आहे.
तसंच त्यांनी आपल्या पक्षाची खासगी सेना म्हणजेच युवा विभागाला सतर्क केलं आहे. त्यांनी यापूर्वी 30 एप्रिल रोजी ट्वीट करून धर्माचे तुकडे करणाऱ्यांना चोख उत्तर मिळेल. जोरदार तयारी केली आहे. हिंदू-मुस्लीम, शीख-ख्रिश्चन हे भाऊ भाऊ आहेत, असं ट्वीट तेजप्रताप यांनी केलं होतं.
तेजप्रताप यांच्या इशाऱ्यानंतर बागेश्वर बाबाला बिहार येथे विशेष सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यक्रमात 300 जवानांना तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रम निर्धोकपणे पार पडण्यासाठी दर थोड्या अंतरावर जवान गस्त घालणार आहेत. 12 मे रोजी कलश यात्रेसह या कथेचा प्रारंभ होणार आहे.

























































