तेलंगणामध्ये काँग्रेसला विजयाची वाट दाखवणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? सीएमच्या रेसमध्येही अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्ता राखण्याची चिन्ह असून राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जोरदार चूरस सुरू आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने कमाल केली असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतेय. केसीआर यांच्या सत्तेला सुरुंग लावत येथे काँग्रेसची सत्ता येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचीही चर्चा सुरू झालीय.

तेलंगणामध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार आहेत. यात प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार कॅप्टन एन. उत्तमकुमार रेड्डी, कोमाटिरेड्डी वेंकटरेड्डी आणि मल्लु भट्टी विक्रमार्क यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव आघाडीवर आहे. कोण आहेत हे रेवंत रेड्डी?

काँग्रसच्या विजयाचे श्रेय रेवंत रेड्डी यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे. रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 2019मध्ये तेलंगणातून काँग्रेसचे तीन खासदार निवडून आले होते. यात रेवंत रेड्डी यांचाही समावेश होता. मात्र यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली असून मुख्यमंत्री के. सी. राव यांच्याविरोधात ते गजवेल मतदारसंघातून उभे राहिले.

रेवंत रेड्डी यांनी राजकारणाची सुरुवात एबीव्हीपीपासून केली होती. त्यानंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षामध्ये प्रवेश केला. 2009मध्ये रेवंत रेड्डी यांनी कोडांगल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये त्यांची तेलंगणा विधानसभेत तेलुगू देसम पार्टीचे नेते म्हणून निवड झाली.

2017मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र काँग्रेसने विश्वास दाखवत त्यांना 2019 ला मलकाजगिरीमधून लोकसभेचे तिकीट दिले. येथे त्यांनी विजय मिळवला आणि 2021मध्ये त्यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद दिले. तेव्हापासून त्यांनी ग्राउंड लेव्हलवर उतरत काँग्रेसला मजबूत केले. याचेच फळ आता काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसतेय.

मतमोजणीचा कल – तेलंगणात काँग्रेसची ‘कमाल’, मध्यप्रदेशात भाजपचं ‘कमल’; राजस्थान-छत्तीसगडमध्ये चूरस कायम