
लाचखोरीची चटक लागलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याची अफाट माया पाहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत. तेलंगणा रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मधील विभागीय अभियंता मुत्यम व्यंकट रमना याच्या घरावर आणि नातेवाईकांच्या ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत तब्बल 100 ते 150 कोटी रुपयांच्या अफाट संपत्तीचा पर्दाफाश झाला आहे.
बुधवारी एसीबीच्या पथकाने रमना यांच्या घर, कार्यालय आणि नातेवाईकांशी संबंधित अशा एकूण 8 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा कितीतरी पटीने अधिक संपत्ती आढळल्याने, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या प्राथमिक तपासानुसार, या लाचखोर अभियंत्याने भ्रष्टाचाराचा पैसा रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवला होता. त्याने स्वतःच्या पत्नीच्या नावाने तब्बल 4 कन्स्ट्रक्शन कंपन्या नोंदवून घेतल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून अंजनेया नगर आणि मुसापेठ भागात 10 निवासी अपार्टमेंट्सचे काम सुरू असून त्यात सुमारे 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
सेरिलिंगमपल्ली आणि कुकटपल्ली भागात 1.23 कोटींचे 4 आलिशान फ्लॅट्स, कुकटपल्लीत 1.82 कोटींची G+3 कमर्शियल इमारत आणि सेरिलिंगमपल्लीत 2.90 कोटींची G+5 कमर्शियल इमारत असल्याचे उघड झाले. एवढेच नाही तर तब्बल 4 कोटी रुपये किमतीचे 2 किलो 90 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बँक खात्यांमध्ये 52.02 लाख रुपयांच्या ठेवीही असल्याचे समोर आले.
यासह 45 लाख रुपये किमतीच्या 3 आलिशान गाड्या, 30 लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स व घरातील मौल्यवान सामान आणि 2.5 लाख रुपये किमतीच्या 20 महागड्या परदेशी दारूच्या बाटल्याही एसीबीच्या पथकाला आढळून आल्या. सरकारी दस्तऐवजांनुसार एसीबीने या सर्व संपत्तीचे अधिकृत मूल्य 27.65 कोटी रुपये दर्शवले असले तरी रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते या मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी, कमर्शियल इमारती आणि अपार्टमेंट्सचे आजचे बाजारमूल्य 100 ते 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
2019 मध्येही एसीबीने रंगेहात पकडलेले
विशेष म्हणजे, मुत्यम व्यंकट रमना याच्यावर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई नाही. याआधी 12 डिसेंबर 2019 रोजी सायबर सिटी सर्कल येथे कार्यरत असताना एका कामाच्या फायनल एस्टीमेट मंजुरीसाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले होते. त्या वेळी घेतलेल्या झडतीतही त्याच्याकडे 26.52 लाख रुपयांची रोकड आणि 22.60 लाखांचे सोने सापडले होते. त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले असतानाही या अधिकाऱ्याचा लाचखोरीचा सिलसिला थांबलेला नव्हता. आता पुन्हा त्याच्यावर कारवाई करणअयात आली आहे. एसीबीने त्याला हैदराबाद येथील विशेष एसीबी न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तसेच त्याच्या नावावरील बेनामी संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि अन्य गुप्त गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी एसीबीचे पथक पुढील तपास करत आहे.




























































