पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांच्या पत्नीचा टाहो, बदला घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलंदशहर

गोहत्येच्या संशयावरून प्रचंड हिंसाचार भडकलेल्या उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. हिंसाचारामागे बजरंगदलाचे जिल्हा समन्वयक योगेश राय हे मुख्य आरोपी असून, ते फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिंसाचारात गोळी लागून मृत्युमूखी पडलेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला. त्यांच्या पत्नी रजनी यांनी टाहो फोडला. माझ्या पतीची हत्या केली असून, बदला घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बुलंदशहरानजीकच्या गावात 25 मृत गायी सोमवारी सकाळी आढळल्या. ही गोहत्या असल्याच्या संशयावरून प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बुलंदशहरात पोलीस ठाण्यावर हल्ला करीत जाळपोळ, दगडफेक केली. या जमावाने गोळीबार केला. यात गोळी लागून गंभीर जखमी झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांचा मृत्यू झाला.

दादरी हत्याकांडाशी कनेक्शन?
28 सप्टेंबर 2015 रोजी उत्तरप्रदेशात दादरी येथे गोमांस घरात ठेवल्याच्या संशयावरून हिंसक जमावाने मोहम्मद अखलाक याची ठेचून हत्या केली होती. या हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली. या हत्याकांडाचा तपास पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांनी केला होता. त्यांनी अनेकांना अटक करून आरोपपत्र दाखल केले होते. या दादरी हत्याकांडाचा सुबोधकुमार यांच्या मृत्यूशी संबंध आहे का? त्यांना गोळी कोणी घातली याचा तपास पोलीस करीत आहेत.

तणाव, बंदोबस्त कायम

  • हिंसाचारप्रकरणी 50 ते 60 जणांची ओळख पटली असून, 37 जणांवर एफआयआर दाखल केला आहे. चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी बजरंगदलाचा जिल्हा समन्वयक फरार झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंदकुमार यांनी सांगितले.
  • सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, बंदोबस्त कायम आहे.
  • पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांच्या हत्येशी बजरंगदलाचा संबंध नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला नाही, असे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.

सर्वांचे डोळे पाणावले

  • शहीद पोलीस अधिकारी सुबोधकुमार सिंह यांचे वडिलही पोलीसदलात होते. त्यांचा मोठा भाऊ लष्करात होता. आता निवृत्त झाला आहे. सुबोधकुमार यांच्यामागे पत्नी आणि मुलगा आहे.
  • सुबोधकुमार यांचे पार्थिव हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. मृतदेह पाहताच कुटुंबाला शोक अनावर झाला. पत्नी रजनी यांनी टाहो फोडला. यावेळी हॉस्पिटलमधील उपस्थितांचे डोळे पाणावले.
  • माझ्या पतीची हत्या करण्यात आली. याचा बदला घ्या, अशी मागणी रजनी यांनी केली आहे. सुबोधकुमार यांच्या मुलानेही प्रश्न उपस्थित केले आहे. ‘मी एक चांगला नागरिक व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. आज माझे वडील हिंदू-मुस्लिम वादात शहीद झाले. उद्या आणखी कोणाचे तरी वडील शहीद होतील, असे अभिषेक सिंहने म्हटले आहे.
  • दरम्यान, पोलीस गोळीबारात मृत्युमूखी पडलेल्या 20 वर्षीय सुमितकुमारच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. 50 लाखांची भरपाई आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची मागणी केली आहे.