दहशतवादी हुजैफावर भाईंदरमध्ये झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर तरुणांना भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा कट आखणारा दहशतवादी हल्लेखोर हुजैफा याच्या मिरा-भाईंदर परिसरात मुसक्या आवळ्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. हल्लेखोर हा सय्यद मुनस्सीर हुसैन उर्फ मुना झिंगाडा याच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

वांद्रे परिसरातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत तरुणांना भडकवून बेकायदेशीर व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करण्याचा कट रचण्याचे काम पाकिस्तानातून गुप्तपणे सुरू होते. हुजैफावर मुंबईत स्थानिक नेटवर्क उभारणे आणि कारवायांसाठी आर्थिक व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याला या नेटवर्ककडून सुमारे एक लाख रुपये मिळाले आहेत. तसेच त्याने काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून कामाच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवले असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तौकीर आणि साजीद शेख यांना वांद्रेप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. दोघांनाही ड्रग्जचे व्यसन असून सहज पैसा मिळवण्याच्या लालसेपोटी या नेटवर्कच्या संपर्कात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.