IND vs ENG Test – नव्या टीम इंडियाची आजपासून कसोटी

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तब्बल नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर उभय संघ पुन्हा एकदा उद्यापासून तिसऱया कसोटीत राजकोटमध्ये भिडणार आहेत. हिंदुस्थानी संघात नव्या दमाचे खेळाडू खेळणार असल्यामुळे या कसोटीद्वारे नव्या टीम इंडियाचीच कसोटी लागणार आहे. अनेक अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत मुंबईकर सरफराज खानला संधी मिळण्याची दाट शक्यता असून यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल हासुद्धा पदार्पण करू शकतो.

महान खेळाडू विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच माघार घेतली आहे. दुसरीकडे लोकेश राहुल दुखापतीमुळे तिसऱया कसोटीत खेळणार नाही. याचबरोबर श्रेयस अय्यर व अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेपासून दूर आहेत. शिवाय प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही राजकोट कसोटीत विश्रांती मिळणे जवळपास निश्चित आहे. तो राजकोटमध्ये दाखलही झालेला नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. दुखापतीतून सावरलेला अष्टपैलू रवींद्र जाडेजाचेही तिसऱया कसोटीत खेळणे संदिग्ध आहे. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया कसोटीत नवी टीम इंडिया खेळताना दिसेल. यात फक्त चारच अनुभवी खेळाडू असतील.

राजकोट कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव व रविचंद्रन अश्विन हे चार अनुभवी खेळाडू हिंदुस्थानी संघात असतील. त्यातही जाडेजाचे खेळणे तळय़ात-मळय़ात आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची, तर कसोटी संघात निवडही केलेली आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीला नव्या पिढीला कसोटी क्रिकेटसाठी तयार करायचे हे सहज लक्षात येते.

…तर कसोटी पदार्पण बाबांना अर्पण
राजकोट कसोटीत मला पदार्पण करण्याची संधी मिळाली तर मी ही कसोटी माझ्या वडिलांना अर्पण करणार. कारण माझे बाबाच माझे हीरो आहेत, मार्गदर्शक आहेत. जेव्हा मला काहीही अडचण असते तेव्हा मी फक्त माझ्या बाबांशी बोलतो, असे युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल म्हणाला.

इंग्लंड दोन वेगवान गोलंदाजांसह उतरणार
विशाखापट्टणम कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडने तिसऱया कसोटीसाठी संघात केवळ एकच बदल केला आहे. शोएब बशीरऐवजी मार्क वूड या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे राजकोटवर दोन वेगवान गोलंदाजांसह तीन फिरकीवीर घेऊन उतरणार आहे. रेहान अहमदचा व्हिसाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. त्यामुळे तोसुद्धा संघात कायम असेल. इंग्लंडने पहिल्या कसोटीत विजयानंतरही संघातून मार्क वूडला वगळले होते. आता त्याला पुन्हा संघात घेतले असून तो जेम्स अॅण्डरसनच्या साथीने संघाची वेगवान गोलंदाजी सांभाळेल.

बेन स्टोक्सचे कसोटी शतक
राजकोट कसोटीसाठी स्टोक्स मैदानात उतरेल तेव्हा तो आपल्या कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण करील. तो 100 कसोटी खेळणारा इंग्लंडचा 16 वा कसोटीपटू असेल. या शतक महोत्सवी कसोटीबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझ्यासाठी ही नेहमीसारखीच महत्त्वाची कसोटी आहे. जशी 99 वी होती आणि पुढे 101 वीसुद्धा असेल.’’ स्टोक्सने 2013 साली कसोटी पदार्पण केले होते. तसेच गेल्या अडीच वर्षांत 20 कसोटी त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले असून 14 कसोटी जिंकल्या आहेत.

अश्विन 500च्या उंबरठय़ावर
विशाखापट्टणम कसोटीत अश्विन आपले विकेटचे पंचशतक पूर्ण करू शकला नव्हता, पण राजकोट कसोटीत तो हा विक्रम नक्कीच पूर्ण करील. तिसऱया कसोटीत एक विकेट टिपताच तो 500 कसोटी विकेट घेणारा पुंबळेनंतर दुसरा हिंदुस्थानी आणि जगातला नववा गोलंदाज ठरेल. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये अॅण्डरसन (695), नॅथन लायन (517) हेच दोन गोलंदाज अश्विनच्या पुढे आहेत. तसेच अश्विन वेगवान 500 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल. मुरलीधरनने 87 व्या कसोटीत हा पराक्रम केला होता तर अश्विन 98 कसोटीत मान मिळवेल. याव्यतिरिक्त अन्य सातही गोलंदाजांनी 105 पेक्षा अधिक कसोटीनंतर हा टप्पा गाठला आहे.

राजकोट कसोटीसाठी अंतिम संघ
इंग्लंड : झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेअरस्टॉ, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन पह्क्स (यष्टिरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अॅण्डरसन.

हिंदुस्थान : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा/कुलदीप यादव , अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.