
ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर विजय सिंघल याची नियुक्ती झाली आहे. ठाणे पालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या ठाणे पालिका आयुक्तपदावर अखेर विजय सिंघल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याशिवाय सात सनदी अधिकाऱयांच्या बदल्या व फेरनियुक्त्या सरकारने केल्या आहे.
मावळते पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली. काही दिवसांपूर्वी ते रजेवर गेले. त्यामुळे ठाण्याच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता होती. अखेर ठाणे महापालिका आयुक्तपदासाठी सिंघल यांचे नाव निश्चित झाले. सिंघल यापूर्वी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते. दरम्यान, एम. जी. अर्दाड यांची संभाजीनगर येथे मृद आणि जलसंधारण विभागाच्या आयुक्तपदी; माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संचालक मदन नागरगोजे यांची मंत्रालयात विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या सहसचिवपदी; रणजीत कुमार यांची माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी; अभिजित बांगर यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी तर एल. एस. माळी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यू. ए. जाधव यांची मंत्रालयात ग्रमविकास विभागात उपसचिवपदी नेमणूक झाली आहे.

































































