
ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आज वरिष्ठ आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती झाली. गृह विभागाने बदलीचे आदेश जारी करत डुंबरे यांच्याकडे ठाण्याच्या पोलीस प्रमुखाची जबाबदारी सोपवली. तर ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्याच्या अॅण्टी करप्शन ब्युरोच्या प्रमुखपदी वर्णी लागली.
जयजीत सिंह हे गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही तसेच त्यांची पोलीस महासंचालकपदी बढती झाल्यानंतरही त्यांनाच ठाणे पोलीस आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले होते. अखेर गृह विभागाने त्यांची बदली केली आणि अॅण्टी करप्शन ब्युरोच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. तर राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून यशस्वी कामगिरी बजावणारे अपर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली. 1994 बॅचचे थेट आयपीएस अधिकारी असलेले डुंबरे यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून कामकाज केले होते. त्यामुळे त्यांना ठाण्याची कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीबाबत चांगलीच माहिती आहे. आशुतोष डुंबरे यांनी मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठsच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणूनदेखील धडक कामगिरी केली होती. ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून डुंबरे कामकाज करणार असल्याने यापुढे ठाण्यात चांगली पोलिसिंग बघायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
























































