
सामना प्रतिनिधी। ठाणे
टीएमटीच्या 94 मार्गांवर धावणाऱ्या 300 बसेसमधून दररोज दोन लाख प्रवासी ये-जा करतात. मात्र यातील फुकटय़ा प्रवाशांची घुसखोरी रोखण्यासाठी केवळ 25 टीसीच कार्यरत असल्याने परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. या ‘विनातिकीट’ प्रवाशांना ‘ब्रेक’ लावण्यासोबतच जीसीसी तत्त्वावर चालणाऱ्या बसवाहकांच्या तिकीट विक्री अपहारावर अंकुश ठेवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे ब्रेक डाऊन झालेल्या टीसींच्या पदोन्नतीची दुरुस्ती करून ठाणे परिवहन सेवा मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या बसेससह जीसीसी तत्त्वावरील गाडय़ा पालिका हद्दीत धावतात. मात्र या बसमधील अंदाजे दोन लाख प्रवाशांकरिता 75 तिकीट तपासनीसांची गरज असताना केवळ 25 टीसी कार्यरत आहेत. या तुटपुंज्या टीसींच्या जिवावर ठाणे शहरासह मुलुंड, बोरिवली, अलिमघर, बीकेसी, खिडवाळी या लांब पल्ल्याच्या मार्गांवर देखरेख ठेवणे अशक्य असते. त्यातच जीसीसीनुसार तुटपुंज्या वेतनावर काम करणारे वाहक टीसी नसल्याचा फायदा उठवत तिकीट विक्रीचा अपहार करून पैसे कमावत असल्याचा आरोप ठाणे परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक यांनी केला आहे. याबाबत महाडिक यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे.
पदोन्नती रखडली
टीएमटीतील बहुतांश कर्मचाऱयांनी सेवेत 30 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना पदोन्नती देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार वरिष्ठ पदांच्या पदोन्नती प्रशासनाने दिलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष मार्गावर काम करणारे सहाय्यक वाहतूक निरीक्षक कर्मचाऱयांना पदोन्नती देणे आवश्यक असतानाही याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप परिवहन समिती सदस्य प्रकाश पायरे यांनी केला आहे. त्यांना तातडीने पदोन्नती दिल्यास फुकटय़ा प्रवाशांवर टाच येणार असल्याचे पायरे यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच सध्या वाहतूक नियंत्रक कर्मचारी सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदाचे वेतन घेत आहेत.
आधीच कमी, त्यात अतिरिक्त कामाचे ओझे
टीएमटीत आधीच टीसींची संख्या कमी असताना त्यांना मार्गावरील अपघातानंतर पोलीस ठाण्यात जाऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करावे लागतात. त्यातच 90 टक्के चौक्यांवर चालक, वाहकांना वाहतूक नियंत्रक म्हणून बसवले जाते. मात्र मार्गावर काम करणारे चालक-वाहक त्यांच्यापेक्षा सीनिअर असल्याने त्यांच्यात खटके उडतात. त्यामुळे फेऱया रद्द होण्याचेही प्रमाण वाढत आहे.



























































