सोलापूर महापालिकेवरील जप्तीची कारवाई टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिटी बस अपघातातील मृताच्या नातेवाईकांना गेल्या नऊ वर्षांपासून न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसानभरपाई न दिल्याप्रकरणी जप्तीची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पालिकेच्या नूतन आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली-उगले यांनी पदभार घेताच ही कारवाईची नोटीस आली होती. आयुक्तांनी बेलिफ आणि मृताच्या नातेवाईकांना ठोस आश्वासन दिल्याने कारवाई तूर्तटळली आहे.

सोलापूर मनपाच्या सिटी बसने रेल्वे स्टेशनजवळ शिवलिंगप्पा आनंदप्पा हिरेमठ (रा. वारद चाळ, रामलाल चौक) याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने मृताच्या कुटुंबाला आठ लाख 58 हजार नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. नऊ वर्षांपासून नुकसानभरपाईचे प्रकरण प्रलंबित असल्याने मृताच्या कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयाकडे दाद मागितली होती. मोटार अपघात दावे प्राधिकरणाचे न्यायाधीश एस. ए. भोसले यांनी जप्तीचा आदेश दिला होता. न्यायालयाचे एक पथक पालिकेत येऊन जप्तीच्या कारवाईचा आदेश आयुक्त तेली-उगले यांना दिला. यावर येत्या 15 दिवसांत भरपाई देण्याचा लेखी आश्वासन दिल्याने तूर्त कारवाई टळली आहे. आयुक्तांनी पदभार घेताच हा आदेश आल्याने पालिका वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.