
मुंबई महानगरपालिकेत आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभाग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वयासाठी एक सब इंजिनीअर नेमण्यात येणार असून चीफ इंजिनीअरसह आवश्यक कर्मचाऱयांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला उपायुक्त स्तरावर मंजुरी मिळाली असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर तातडीने या विभागाचे काम सुरू होणार आहे. पालिकेच्या सध्याच्या पर्यावरण विभागाचा कारभार फक्त एकाच उपायुक्ताच्या खांद्यावर असल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये 2 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाले होते.
पालिकेत 2005 मध्ये उपायुक्त पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार झाले, तर 2016 पर्यंत पालिकेचा पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग एकाच उपायुक्ताच्या माध्यमातून काम करीत होते. मात्र 2016 मध्ये या विभागाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आले. मात्र दोन्ही विभागांच्या अंतर्गत असणाऱया कर्मचाऱयांपैकी पर्यावरण विभागाला एकही कर्मचारी देण्यात आला नाही, तर सुमारे 40 हजार कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्तांच्या अखत्यारीत समाविष्ट करण्यात आले. यातच गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत प्रदूषण वाढल्याने हवेची गुणवत्ता प्रचंड खालावत असल्याने उपाययोजना करण्यासाठी पालिकेची तारांबळ उडत आहे. मात्र पर्यावरण विभागाकडे कर्मचारीच नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक वेळा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि इतर कर्मचाऱयांची तात्पुरती मदत पर्यावरण विभागाला घ्यावी लागत आहे. त्यामुळे पर्यावरणासाठी तयार होणारा स्वतंत्र विभाग फायदेशीर ठरणार आहे.
कारवाईचे अधिकार देणार
1. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने 25 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर करून मुंबईत सर्व सहा हजारांवर बांधकामांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. यानुसार विभागवार तपासणी करून कारवाई सुरू आहे.
2. यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. शिवाय नियम मोडणाऱयांवर कारवाई करणे, नोटीस बजावणे आणि दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. यासाठी ‘बायलॉज’मध्ये आवश्यक बदल करण्यात येतील.
3. तर नव्याने स्थापन होणाऱया विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या माध्यमातून चालणाऱया कामांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येईल.
अशी होणार नव्या विभागाची रचना
– पर्यावरण विभागाचा एक चीफ इंजिनीअर
– दोन डेप्युटी चीफ इंजिनीअर
– तीन एक्झ्युकिटिव्ह इंजिनीअर
– सातही झोनसाठी असिस्टंट इंजिनीअर
– समन्वयासाठी वॉर्डमध्ये सब इंजिनीअर
– अधिकाऱयांच्या अंतर्गत आवश्यक कर्मचारी
























































