कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सातारा

सातारा जिह्यात सर्वदूर पाऊस मोठय़ा प्रमाणात कोसळत असून पावसाने जूनचा अनुशेष जुलैमध्ये भरून काढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून धरणात २४ तासात तब्बल ७ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पाटण, कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवार दि. १७ जुलै रोजी ४ वाजून २ मिनिटांनी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असुन धरणातून ५००० क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे. तसेच पायथा वीज गृहातुन २१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर पाहता सध्या ७१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये होत आहे. सध्या कोयना धरणामध्ये ७८ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माण, खटाव व फलटण तालुके वगळता सर्वत्र पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सातारा तालुक्यासह कास, बामणोली परिसरात पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कासच्या पुलावरुन पाणी जात असल्याने कास, धावली, बामणोली या भागातील एसटी सेवा कोलमडली आहे. परळी, ठोसेघर परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून पळसावडे धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. रस्त्यावर दगड माती वाहून येत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

पाटण तालुक्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र अतिवृष्टी सुरु असून कोयना धरणाच्या जलाशयाची पाणी पातळी आज सकाळी ८ काजता ६५१.२८१ मी. होती. रात्री पाणी सांडक्याच्या माथ्यापर्यंत म्हणजे कक्रद्वाराच्या तळापर्यंत पोहोचले आहे. सध्या कोयना धरणात ७६.७९ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ८ काजल्यापासून कोयना धरण पायथा कीजगृहातून २१०० क्युसेक्सनी पाण्याचा किसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत असून, दुपारच्या सुमारास धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात कोयनेला २३७, नवजाला २६३, तर महाबळेश्वरला २७२ मिलीमीटर इतका तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद ७८ हजार ४८५ क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याची माहिती कोयना सिंचन किभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे.

जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने नदी, ओढे, नाले, खळखळू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे मल्हारपेठ विभागातील ठोमसे येथील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे घाटमाथा, नावडी, शिरळ, येरफळे येथील अनेक घराची पडझड झाली असल्याची माहिती तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने ओढे – नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्याने कोयना कांदाटी खोऱ्याला जोडणाऱ्या चतुरबेट येथील नदीच्या पुलावरुन अंदाजे २ ते ३ फूट पाणी वाहत आहे. चतुरबेट, दाभेमोहन, घोणसपूर, शिरणार, अहिर, रुळे, गावढोशी, आळवण, वाळणे, दरे या गावासह ५० गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामध्ये भातशेतीचे नुकसान मोठय़ा प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महादरे तळे, हत्ती तलाव भरला

गेल्या महिनाभरापासून साताऱ्यात पाऊस आहे. या पावसामुळे सातारा शहर तसेच परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरु झाले आहेत. डोंगरातून पाण्याचे धबधबे वाहू लागले आहेत. यवतेश्वर घाटातील धबधबा सुरु झाल्याने मंगळवारी हत्ती तलाव भरला. या हत्ती तलावातून नैसर्गिकरित्या पाणी झिरपून महादरे तलावात येते. महादरे तलावातील गाळ मे महिन्यातच जलसंपदा विभागाच्या सहकार्याने काढण्यात आला होता. आता हा तलाव पाण्याने पूर्ण भरला आहे. या तलावातील पाण्याचा वापर शहरातील शुक्रवार पेठ तसेच व्यंकटपुरा पेठेत पिण्यासाठी न करता वापरासाठी केला जातो. या पेठांना कास पाणी योजनेतूनही पिण्यासाठी पाणी दिले जाते. महादरे तळे भरल्याने दोन्ही पेठांची पाण्याची चिंता मिटली आहे.