मुंबईत तेरा दिवस उत्सवाचा भोंगा; अजून दोन दिवस सरकारच्या हातात

राज्य सरकारने या वर्षातील तेरा दिवस मध्यरात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर्स लावण्याला परवानगी दिली आहे. त्यात येत्या सोमवारी साजऱया होणाऱया छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा समावेश आहे. मुंबईत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावण्यास परवानगी देण्याबाबतचे दिवस उपनगर जिल्हाधिकाऱयांनी निश्चित केले आहेत. ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमानुसार काही ठराविक अटींवर ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धनाचा वापर बंद सभागृहात, हाँलमध्ये व अन्य काही बंद ठिकाणी करता येतो पण इतर सार्वजनिक ठिकाणी सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावण्यावर निर्बंध आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात वर्षातील पंधरा दिवस मध्यरात्री बारावाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावण्याला परवानगी राज्य सरकारला दिली आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱयांनी पंधरापैकी तेरा दिवस निश्चित केले आहेत.