
नगर-पाथर्डी, नगर-कोपरगाव, नगर-सोलापूर महामार्गांच्या कामासाठी आमदार नीलेश लंके यांच्या आंदोलनाबाबत तिसऱया दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही. आज संतप्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी लंके यांच्या समर्थनार्थ पुणे-नगर महामार्गावर सुपे येथे, तर नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी पाथर्डी येथे महामार्गावर टायर जाळले, तर महामार्गाच्या कार्यालयातील खुर्ची जाळल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
जर आम्ही ठेकेदाराकडून काही गोलमाल केला असेल, तर मी आमदारकीचा राजीनामा देतो, जर त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान आमदार लंके यांनी दिले आहे.
आमदार लंके यांच्या आंदोलनाकडे प्रशासन किंवा वैद्यकीय अधिकारी फिरकला नसल्याची टीका करण्यात आली होती. आज प्रशासनाला जाग आली असून, उपोषणस्थळी दोन दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून, डॉक्टरांनी आमदार लंके यांची तपासणी केली. दरम्यान, काल भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी लंके यांच्या उपोषणावर टीका केली होती. यावर पाप झाकण्यासाठी भाजपवाले असे उद्योग करीत आहेत, अशी टीका लंके समर्थकांनी केली आहे. लंके यांच्यासोबत शिवशंकर राजळे, हरिहर गर्जे, किसन आव्हाड, राजेंद्र दौंड उपोषणाला बसले आहेत. तसेच लंके यांच्या आई शकुंतला लंके आणि बहीण वंदना गंधाटे यादेखील आंदोलनस्थळी बसून होत्या.
आज नागरिक आणि लंके समर्थकांनी नगर-पुणे महामार्गावरील सुपा येथे आणि नगर-कल्याण मार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे रास्ता रोको केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत रस्त्याची कामे होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
पाथर्डीत आंदोलकांवर गुन्हे
आमदार नीलेश लंके यांना पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत कॉन्स्टेबल संदीप कानडे यांनी फिर्याद दिली आहे. बंडू बोरुडे, सचिन नागापुरे, सीताराम बोरुडे, दिगंबर गाडे, वैभव दहीफळे, देवा पवार, चाँद मनियार, सोमनाथ टेके, अरविंद सोनटक्के, संतोष जिरेसाळ, गहिनीनाथ शिरसाट, विष्णू ढाकणे, दत्ता खेडकर, भगवान दराडे, कृष्णा घायतडक, अर्जुन घायतडक, अविनाश पालवे, बाळासाहेब गर्जे यांच्यासह इतर दहा ते पंधरा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.


























































