
माणसाच्या शरीराच्या मुख्य अवयवांमध्ये पायांचा समावेश होतो. पण, या जगात असाही एक माणूस होऊन गेला ज्याला तीन पाय होते. विशेष म्हणजे तो एखाद्या सर्वसाधारण माणसाप्रमाणे आयुष्य जगला.
तीन पायांचा माणूस होता का? या प्रश्नावर कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावरील प्रश्नावर आलेल्या उत्तरात या माणसाचा उल्लेख करण्यात आला आहे. इटली देशात असा एक व्यक्ती होऊन गेलेला आहे की, ज्याला 3 पाय, 4 पंजे आणि 2 गुप्तांगेसुद्धा होती. त्याचा चौथा पायाचा पंजा हा त्याच्या तिसऱ्या पायाच्या गुडघ्याजवळ होता.
त्याचं नाव फ्रांसिस्को लेन्टीनी (Francesco Lentini) असं होतं. फ्रांसिस्कोचा जन्म इटली देशामधील सिसिली बेटावर 18 मे 1889 मध्ये झाला. फ्रांसिस्कोला जन्मापासूनच तीन पाय होते. याबाबत डॉक्टरांनी त्याच्या आईवडलांना असे सांगितले होते की, त्याच्या आईच्या पोटामध्ये फ्रासिस्को सोबतच आणखीन एक जुळे बाळ होते, जे फ्रांसिस्कोच्या शरीरासोबत जोडले गेले.

फ्रांसिस्कोच्या आईवडीलांनी त्याचे जे जास्त शारीरिक अंग होते, ते ऑपरेशन करून काढून टाकण्याविषयी डॉक्टरांना विचारले होते पण डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, फ्रांसिस्कोच्या आईच्या पोटात त्याच्यासोबत जे जुळे बाळ होते, त्या बाळाच्या पाठीचे हाड फ्रांसिस्कोच्या पाठीशी जोडलेले आहे. त्यामुळेच जर ऑपरेशन करून ही जास्तीचे अंग काढून टाकली तर फ्रांसिस्कोला अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो आणि तो कायमस्वरूपी अपंग बनू शकतो.
फ्रांसिस्कोने सर्कसमध्ये पण काम केले होते. तसेच तो फुटबॉल पण खूप छान खेळायचा. लोकं त्याला तीन पायांचा फुटबॉलपटु असे म्हणत असत.1907 मध्ये फ्रांसिस्कोने थेरेसा मुरे या मुलीसोबत लग्न केले. त्यांना 4 मुलेही झाली होती. 1935 मध्ये त्यांचा घटस्फोट होऊन नंतर फ्रांसिस्कोने हेलन नावाच्या महिलेसोबत लग्न केले. तिने शेवटपर्यंत फ्रासिस्कोला साथ दिली. फ्रासिस्को आपल्या 3 पायांसह एकुण 77 वर्षे जगला. 21 सप्टेंबर 1966 मध्ये फुफ्फुसाच्या आजाराने फ्रांसिस्कोचा मृत्यू झाला.



























































