
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष व नवीन कार्यकारिणी बरखास्त केल्याच्या पार्श्वभूमीवर कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी बुधवारी त्रिसदस्यीय स्थायी समितीची (अॅड हॉक) स्थापना करण्यात आली. भूपेंद्रसिंह बाजवा यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले.
‘डब्ल्यूएफआय’ची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघाला (आयओए) 48 तासांच्या आत कुस्तीच्या कारभारासाठी स्थायी समिती स्थापन करण्याची सूचना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर ‘आयओए’ने हा निर्णय घेतला. भूपेंद्रसिंह बाजवा हे या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर एम. एम. सोमाया आणि मंजुषा पंवर हे या समितीतील इतर दोन सदस्य आहेत.
‘आयओए’च्या प्रमुख पी. टी. उषा म्हणाल्या, कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह आणि त्यांच्या सहकाऱयांनी राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केले आहे. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या तत्त्वांच्या विरोधात स्वतःची मनमानी करत काही निर्णय घेतले होते. त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनने हे सर्व घटनाबाह्य निर्णय रद्द केले आहेत. संजय सिंह यांनी कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली, मात्र घटनात्मक नियम धाब्यावर बसवून स्पर्धा आयोजनाचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी क्रीडा मंत्रालयाने बरखास्त केली.
संजय सिंह यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली होती. तसेच राष्ट्रीय स्पर्धा तातडीने आयोजित केली आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना नियमांचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली.

























































