
सामना ऑनलाईन । मुंबई
मलेशियात नुकत्याच झालेल्या ‘32 व्या मलेशिया इंटरनॅशनल मास्टर्स ओपन ऍथलेटिक्स’ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिह्याच्या तीन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकून मलेशियात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला आहे. चारूदत्त शेणई, नीलेश म्हसकर आणि गणेश प्रभुखोत अशी या तीन खेळाडूंची नावे आहेत. चारूदत्त शेणई यांनी उंच उडीमध्ये सुवर्णपदक तर तिहेरी उडीत कांस्यपदक पटकावले आहे. नीलेश म्हसकर यांनी पाच किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे तर गणेश प्रभुखोत यांनी लांब उडी आणि तिहेरी उडीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

























































