
सामना ऑनलाईन । भोपाळ
कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे किंवा शिकार केल्यामुळे वाघांचा मृत्यू होत असलेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वाघांची संख्या घटल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण वाघानेच वाघाला ठार मारून त्याचा अक्षरशः फडशा पाडल्याची घटना मध्य प्रदेशच्या कान्हा व्याघ्र संरक्षित क्षेत्रात घडली. विशेष म्हणजे ही घटना कॅमेऱ्यात पहिल्यांदाच कैदही करण्यात आली आहे.
शुक्रवार, 22 मार्च रोजी कान्हामधील वनअधिकाऱयांना एक वाघ दुसऱ्या वाघाचा मृतदेह फाडून खात असल्याचे दिसले. हे बघून ते हैराण झाले. त्यांनी लगेचच या दृश्याचे फोटोही काढून घेतले. काही दिवसांआधी वनअधिकाऱयांना एका वाघिणीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसला होता. तेव्हाही एका वाघाने दुसऱ्या वाघाला मारून खाल्ल्याचा अंदाज लावण्यात आला होता. पण यावेळी गस्तीदरम्यान वनअधिकाऱयांना प्रत्यक्ष हे पाहायला मिळाले.
हद्दीच्या वादातून वाघाचा वाघावर हल्ला
कान्हाच्या किसरी भागात एका टी 56 नावाच्या वाघाने टी 36 नावाच्या वाघाला ठार मारले होते. जो वाघ मारला गेला तो हल्ला करणाऱ्या वाघापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. दोन्ही वाघांमध्ये हद्दीचा वाद होता. त्यामुळे एकाने दुसऱ्यावर हल्ला केला. मेलेल्या वाघाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वनअधिकाऱयांना दुसरा वाघ जवळ येऊ देत नव्हता. त्यामुळे वाघाचा मृतदेह ताब्यात घेता आला नाही, असे व्याघ्र संरक्षित क्षेत्राचे संचालक एल. कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
- गेल्या तीन महिन्यांत पाच वाघांचा अशाप्रकारे मृत्यू झाला.
- या पाचपैकी तीन वाघ कमी वयात मृत्युमुखी पडले.
- कान्हामध्ये 100 हून अधिक वाघ असून त्यातील 83 वाघ वयस्कर आहेत.
- 16 मार्च रोजी एका वाघाने दोन लहान वाघांना ठार मारून खाण्याची घटना घडली होती. त्यानंतर 19 जानेवारी रोजी याच वाघाने एका वाघिणीला मारून खाल्ले होते.


























































