परीक्षेसाठी डोळ्यांना ताण देताय? या टिप्सने ठेवा डोळे निरोगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही राज्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये विविध सेमिस्टर आणि स्पर्धा परीक्षांचे आयोजन केलेले आहे. विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत, तसेच परीक्षांसाठी जोरदार तयारी करत आहेत. डिजिटल उपकरणे दीर्घ काळ वापरणे, पुस्तके वाचणे, वाचन आणि परीक्षेचे दडपण यामुळे शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सहसा विचारात घेतल्या न जाणाऱ्या डोळे या अवयवाला प्रचंड थकवा येतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असलेले उपाय नेहमी करणे आवश्यक आहे. मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटलचे फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. वामशीधर यांनी डोळ्यांना निरोगी ठेवण्याबाबत काही टिप्स दिल्या आहते. ते सांगतात की, “डोळ्यांची योग्य निगा राखत असताना, तुम्हाला अनेक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. डोळ्यांचे कार्य सुरळीत राखण्याच्या दृष्टीने करायचे व्यायाम आणि विविध टप्पे याचे गांभीर्य फार कमी जणांना असते.”

अनेकांना सर्रास होणारे डोळ्यांचे त्रास बरे करण्यासाठी पुढे काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत:
– अनेक तास कॉम्प्युटर वापरल्याने अनेकदा डोळ्यांना थकवा जाणवतो. डोळे कमी वेळा उघड-बंद न केल्यास डोळ्यांतले ल्युब्रिकेशन कमी होते आणि त्यामुळे डोळे अधिक थकलेले, कोरडे होतात.

उपाय- वाचन करताना डोळ्यांपासून किमान 25 सेमीचे अंतर राखणे गरजेचे आहे. अनेक तास वाचन करत असताना मध्ये पुरेशी विश्रांती (5 ते 10 मिनिटं) घ्यावी. 5 मीटर अंतरावर असलेल्या लांबच्या वस्तूंवर नजर टाकल्यासही डोळ्यांना आराम मिळू शकतो.
– पुरेशी झोप न झाल्याने डोळे कोरडे होणे, यामुळेही डोळ्यांची जळजळ होते. संसर्ग होण्याचे व अस्वस्थपणा येण्याचे हे सर्रास आढळणारे कारण आहे.

उपाय- डोळे ताजेतवाने ठेवण्यासाठी डोळे चोळणे टाळा. डोळ्यांवर गार पाणी मारल्यास डोळे ताजे राहतात व ओलावा टिकून राहतो.

कृत्रिम अश्रू किंवा आयड्रॉप किंवा ल्युब्रिकेशन यासारखे पर्याय वापरल्यास डोळ्यांतला नैसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी मदत होते.
– काँटॅक्ट लेन्स वापरल्याने झोप अपुरी होणे, हा सर्रास आढळणारा आणखी एक प्रश्न आहे. अनेक तास काँटॅक्स लेन्स घालून ठेवल्यास डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. यामुळेही डोळ्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.

उपाय- अशा स्थितीमध्ये, चष्मा वापरावा आणि लेन्स आणि चष्मा असा दोन्हीचा आळीपाळीने वापर करावा. विद्यार्थ्यांनी सिलिकॉन हायड्रोजनपासून बनवलेल्या चांगल्या गुणवत्तेच्या काँटॅक्ट लेन्सचा वापर करावा. ऑक्सिजन खेळता राहण्याची प्रक्रिया सुधारित असणारे हे नवे साहित्य आहे. यामुळे अस्वस्थ वाटण्याचे प्रमाण बरेच कमी होते.
आकडेवारीनुसार, अपुरी झोप झाल्याने किंवा भरपूर अभ्यास केल्यानं परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 5-10% शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो किंवा डोळ्यांना थकवा जाणवतो.

टिप्स:

1. तुम्हाला चष्मा असेल तर अभ्यास करत असताना नेहमी चष्मा वापरायला हवा.
2. तुम्ही काँटॅक्ट लेन्स वापरत असाल तर दररोज 10-12 तासांपेक्षा जास्त वेळ लेन्स घालू नका.
3. टीव्ही बघणे किंवा मोबाइल गेम खेळणे टाळा.
4. 20-20-20 या नियमाचा सराव करा. 20 मिनिटं वाचन केल्यानंतर डोळे 20 सेकंद बंद करा आणि त्यानंतर 20 फूट इतक्या अंतरावर पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण बराच कमी होईल.
5. ल्युब्रिकंट आयड्रॉप नेहमी किंवा गरजेनुसार वापरा.

साधारणपणे घ्यायची काळजी आणि बाळगायची सावधगिरी:
– अभ्यास करत असताना योग्य स्थितीमध्ये बसा. कधीही पाठीवर झोपून वाचन करू नका.
– डोळे आणि स्क्रीनची खालची बाजू यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असणे, ही आदर्श स्थिती आहे.
– कॉम्प्युटर टर्मिनलसारख्या परावर्तित करणाऱ्या पृष्ठभागांवर काम करत असताना, ग्लेअर व डोळ्यावरील ताण कमी करण्यासाठी अँटि-रिफ्लेक्शन कोटेड ग्लासेसचा वापर करा.
– मंद प्रकाशयोजना असलेल्या ठिकाणी वाचन करणे कटाक्षाने टाळावे, अन्यथा डोळ्यांवर आणखी ताण येतो. चालती बस, ट्रेन किंवा कार यामध्येही वाचन करणे टाळावे.
– परीक्षेदरम्यान वेळापत्रक बदलत असल्याने त्यानुसार आहारामध्ये चांगले बदल करणे महत्त्वाचे आहे. गाजर, पपई, पालक अशा भाज्यांचे व फळांचे सेवन अधिक करायला हवे. या अन्नामध्ये बिटा-कॅरोटिनचे प्रमाण अधिक असते आणि ते दृष्टी निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे असते.
– डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे.
– डोळ्यांची नियमित तपासणी – डोळ्यांना काहीही त्रास होत नसला तरी वर्षातून एकदा ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्या.