कोल्हापूर-सिंधुदुर्गातील हत्तींना पळवण्यासाठी प्रशिक्षित हत्तींचा गट तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात कोल्हापूर-सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतपिकाचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. या भागात कर्नाटक राज्याच्या सहकार्यातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. सात ते आठ ठिकाणी हत्तींना पळवून लावण्यासाठी प्रशिक्षित हत्तींचा गट तयार करून या भागात तो ठेवण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात बुधवारी यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हत्तींचा उपद्रव असलेल्या भागातील उपाययोजना निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अहवाल दिला असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या अहवालातील शिफारसींवर शासनस्तरावर काम सुरू आहे. कर्नाटक राज्याकडून वन विभागाच्या कर्मचाऱयांना यासंबंधीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. हत्तीच्या गस्ती शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. हत्तींचा उपद्रव असलेल्या भागात गस्तीपथक नियुक्त करण्यात येणार असून त्यांना साधाणतः एक महिन्यात वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय जिथे शक्य आहे आणि उपयुक्त ठरू शकेल अशा ठिकाणी सौर कुंपण, हत्ती प्रतिबंधक चर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हत्ती जो चारा किंवा खाद्य खातात त्याची लागवड त्यांचा वावर असलेल्या भागात केल्यास ते इतरत्र जाणार नाहीत हे लक्षात घेऊन केळी, बांबू, ऊस यासह इतर चारा तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथील लोकांमध्येही व्यापक प्रमाणात जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मधमाशांच्या पेट्या असतात तिथे हत्ती येत नाहीत असा एक अनुभव सांगतो. त्याप्रमाणे ही उपाययोजनाही करून पाहावी. यासंबंधीचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावा अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कर्नाटकातून आलेले साधारणतः सात हत्ती आहेत. कोल्हापूर, गगनबावडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.