
सामना ऑनलाईन । कानपुर
उत्तरप्रदेशात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. हरदोई येथील बघोली कस्बा येथील एका कॉलेज तरुणाला तृतीयपंथीयांनी जबरदस्तीने दूध पाजून बेशुद्ध करून त्याचे लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी हरदोई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
बघोली कस्बा येथील घनशाम (नाव बदललेले आहे) हा कॉलेज तरुण पुस्तके खरेदीसाठी 11 जानेवारी रोजी हरदोई येथे गेला होता. पुस्तके घेतल्यानंतर परतत असताना त्याला तेथील उड्डाणपुलाखाली 3 तृतियपंथी आणि 2 तरुण भेटले. तृतियपंथीयांनी त्याला महिन्याला दोन हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचे अमिष दाखवून आपल्याबरोबर नेले. तेथील रेल्वेगंज परिसरातील एका घरात नेऊन त्याला दूध पाजले आणि तो बेशुद्ध झाला. काही दिवसांनी त्याला शुद्ध आली तेव्हा त्याचे लिंग कापल्याचे लक्षात आल्याने तो हादरूनच गेला. सोमवारी घनशामने तृतीयपंथीयांना गुंगारा देऊन कसाबसा पळ काढला आणि एकदाचे घर गाठले. घनशामने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी मंगळवारी त्यांनी पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शनी यांना भेटून आपली कहाणी सांगितली. प्रियदर्शनी यांनी घनशामची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश देऊन संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येणार असल्याची महिती दिली आहे.
























































