
सामना ऑनलाईन, मुंबई
जॉर्ज फर्नांडिस हे लढाऊ स्वभावाचे, लढाऊ वृत्तीचे आणि संकटांशी सामना करताना आपल्या निर्भय वृत्तीचे दर्शन घडवणारे नेते होते. मुंबईची कामगार चळवळ बांधताना त्यांना भांडवलदारांशी संघर्ष करावा लागला तसाच संघर्ष त्यांना मुंबईत नव्याने सशक्त झालेल्या शिवसेनेच्या विचारधारेशीही करावा लागला. परप्रांतीयांनी मुंबई शहरात राहणे कसे स्वाभाविक आहे याची आर्थिक कारणे ते अतिशय सोप्या मराठी भाषेत जाहीर सभेत आपल्या भाषणात समजावून सांगत असत. समोरचा श्रोतृवर्ग आपल्याला अनुकूल नसतानाही आपली बाजू त्याला शांतपणे समजावून सांगण्याचे कौशल्य त्यांच्यात होते. लोकांशी संवाद साधण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्यांनी मल्याळी, कन्नड, तुळू, मराठी आदी भाषा आत्मसात केल्या होत्या. स. का. पाटील यांचा त्यांनी केलेला पराभव आणि कोकण रेल्वेला पुन्हा गती देण्यासाठी मंत्री म्हणून केलेले प्रयत्न महाराष्ट्र विसरणार नाही- नरेंद्र चपळगावकर, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जॉर्जसाहेब हे देशातील सर्वोत्कृष्ट नेते होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याला त्यांनी महत्व दिले. आणीबाणी आणि त्यानंतर लोकशाहीचे ‘चॅम्पियन’ म्हणून ते पुढे आले. अत्यंत धाडसी, प्रामाणिक आणि दूरदृष्टी नेता म्हणून त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले. कामगार, गरिबांच्या न्याय हक्कासाठी ते कायम लढत राहिले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.
राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
माजी केंद्रीयमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाच्या वृत्ताने मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
जॉर्ज फर्नांडिस माझे जवळचे मित्र होते. कामगार, कष्टकरी आणि सामान्य जनतेसाठी आयुष्य वेचणारा नेता आज हरपला आहे. उत्कृष्ट संसदपटू असलेले जॉर्ज यांनी उद्योग, रेल्वे आणि संरक्षण खाते समर्थपणे सांभाळले. 1949 मध्ये जॉर्ज मुंबईत आले आणि कायमचे मुंबईकर झाले. जॉर्ज धाडसी नेते होते. त्यांच्या निधनामुळे तीक्र दुःख झाले आहे- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आज आम्ही लोकांची सेवा करत आहोत, त्यामागे जॉर्ज फर्नांडिस यांनी प्रेरणा आहे. त्यांनीचआम्हाला घडविले. ही वेळ अत्यंत दुःखद आहे. सामान्य माणसासाठी जॉर्जसाहेबांनी लढलेली लढाई कधीही विसरता येणार नाही-नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार

























































