
सामना प्रतिनिधी । त्रिवेंद्रम
शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून केरळात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शबरीमाला मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना आंदोलकांनी कोच्ची विमानतळावरच रोखले. वातावरण चिघळलेले पाहून तृप्ती देसाई यांनी सायंकाळी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. आता मी गनिमी काव्यानेच मंदिरात प्रवेश करेन, असे देसाई यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शबरीमाला मंदिराचे दरवाजे परंपरेप्रमाणे दिवाळीनंतर उघडण्यात आले. भगवान अय्यप्पा स्वामींच्या दर्शनासाठी सध्या शबरीमालात भाविकांची गर्दी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केरळ सरकार महिलांना मंदिरात प्रवेश देण्यावर ठाम आहे. मात्र सनातन्यांनी मंदिराच्या मुख्य दारावरच ठाण मांडले आहे. संघर्ष चिघळत असल्याने प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.
























































