मान्सूनपूर्व पावसाने तलावांच्या पाणीसाठय़ात वाढ, तुळशी, विहार तलावात सर्वात जास्त पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तुळशी, विहार, तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा या तलावांतही रिमझिम बरसात केली आहे. गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रांत एकूण 279 मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीसाठय़ात काहीशी वाढ झाली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया सात तलावांपैकी तुळशी तलावात सर्वाधिक 93 मिमी, विहार तलावात 85 मिमी, तानसा तलावात 54 मिमी, भातसा तलावात 21 मिमी, मोडक सागर तलावात 20 मिमी, मात्र मध्य वैतरणा तलावात 4 मिमी व उच्च वैतरणा तलावात 2 मिमी इतका कमी पाऊस पडला आहे.मुंबईकरांना तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी तलावात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची आवश्यकता असते. या सात तलावांपैकी विहार व तुळशी हे दोन तलाव मुंबईत पूर्व उपनगर भागात असून उर्वरित पाच मोठे तलाव हे मुंबईबाहेर ठाणे जिल्हा परिसरात आहेत. या सात तलावांपैकी सर्वात जास्त म्हणजे एकूण पाणीसाठय़ाच्या जवळजवळ 50 टक्के म्हणजे 7,17,037 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा एकटय़ा भातसा तलावातून केला जातो तर सर्वात कमी पाणीपुरवठा क्षमतेने कमी असलेल्या तुळशी (8,046 दशलक्ष लि.) व विहार (27,698 दशलक्ष लि.) या तलावातून होतो. उर्वरित पाणीपुरवठा हा तानसा 1,45,080दशलक्ष लि.), मध्य वैतरणा (1,93,530 दशलक्ष लि.), मोडक सागर (1,28,925 दशलक्ष लि.), उच्च वैतरणा (2,27,047 दशलक्ष लि.) या चार तलावांतून होतो.

पाऊस लांबल्यास पाणीकपात

हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र कधी कधी हवामान खात्याचे अंदाज चुकतात. त्यामुळे जर यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यास अथवा कमी पाऊस पडल्यास तलावांतील एकूण पाणीसाठय़ाचे गणित करून वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला नाइलाजाने कमीअधिक प्रमाणात पाणीकपात करावी लागते.

तलावांत 51 दिवसांचा पाणीसाठा

सात तलावांत सध्या 1,98,568 दशलक्ष लिटर (13.72टक्के) इतका पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांतील 9 व 10 जूनच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. मात्र पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा अधिक आहे. 11 जून 2021मध्ये सात तलावांत मिळून एकूण 1,82,902 दशलक्ष लि. (12.64 टक्के) इतका, 11 जून 2020 मध्ये सात तलावांत एकूण 1,92,407 दशलक्ष लि. (13.20 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र तलावात 1,98,568 दशलक्ष लिटर इतका (13.72 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा व शिल्लक पाणीसाठा यांचे गणित केल्यास सदर पाणीसाठा हा मुंबईकरांना पुढील 51 दिवस पुरेल इतका म्हणजेच पुढील 31 जुलै 2022पर्यंत पुरेल इतका आहे.

सात तलावांतील पाणीसाठा

तलाव 2 दिवसांतील पाणीसाठा
पाऊस मिमी दशलक्ष लि.
उच्च वैतरणा 2.00 0
मोडकसागर 20.00 47,746
तानसा 54.00 9,709
मध्य वैतरणा 4.00 38,151
भातसा 21.00 96,844
विहार 85.00 3,832
तुळशी 93.00 2,286