गावठी कट्ठा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथक एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावठी कट्ठा विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीयासह दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन मोबाइल असा 85 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वाघोलीतील बसस्थानकाजवळ करण्यात आली. शुभम शांताराम शिसवाल ( वय 19 , रा. गांधीनगर मुगर रोड खंडवा मध्यप्रदेश ) आणि सनी संजय जेधे (वय 24 रा. लोणावळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर पथकासह लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वाघोलीतील बसस्थानकाजवळ दोघेजण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रविण उत्तेकर आणि संदिप शिर्के यांना मिळाली. पथकाने सापळा रचून शुभम आणि सनीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि दोन मोबाइल जप्त केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, प्रविण उत्तेकर, संदिप शिर्वेâ, मारुती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, विशाल शिंदे, पांडुरंग पवार,राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख यांनी केली.

गावठी कट्टा विक्रीसाठी दोघेजण आल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांना अटक करून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. आरोपींनी हे शस्त्र कोणाला विकण्यासाठी आणले होते, याचाही शोध घेतला जात आहे. – विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक एक