रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोले तालुक्यातील कोतूळ येथे देशमुख आणि गोडे या दोन कुटुंबांमध्ये रस्त्याच्या वादातून जबर हाणामारी झाली. या हाणामारीत देशमुख कुटुंबातील तिघांसह पोलीस पाटीलही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लोणी येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी जमावाने गाव बंद ठेवून निषेध केला आहे.

सुरेश वामन देशमुख, देवीदास वामन देशमुख, बाळासाहेब पांडुरंग आरोटे हे जखमी झाले, तर पोलीस पाटील सतीश देशमुख हेदेखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी नामदेव दगडू गोडे, लक्ष्मण नामदेव गोडे, भरत नामदेव गोडे, विठ्ठल नामदेव गोडे, जितेंद्र लक्ष्मण गोडे, इंदिरा लक्ष्मण गोडे, सरला भरत गोडे, वनिता विठ्ठल गोडे (सर्व रा. कोतूळ, ता. अकोले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महेंद्र सुरेश देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

कोतूळ येथील गोडे आणि देशमुख या कुटुंबांचा जमिनीतून जाणार्‍या रस्त्याचा वाद आहे. काही दिवसांपूर्वी हा रस्ता खुला करण्यासाठी न्यायालयीन निकाल झाला होता. यानंतर महसूल प्रशासनाने देशमुख कुटुंबीयांना रस्ता खुला करून दिला होता. त्यानंतर अवघ्या एका महिन्यातच पुन्हा हा वाद उफाळून आला. या रस्त्यावर गोडे कुटुंबीयांनी घराचे बांधकाम सुरू केले असता, या बांधकामाला देशमुख कुटुंबीयांनी लेखी हरकत घेतली होती.