दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

दोन विषयांत नापास झाल्याने नैराश्य आलेल्या पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने शेततळ्यात तर सरस्वती भुवन प्रशालेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, या मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मयूर पार्क परिसरातील शिक्षक कॉलनीत राहणारी श्रुती रामदास गव्हाणे या पंधरावर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. श्रुतीचे वडील हे सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला निघून गेले. बारावीत शिकणारा श्रुतीचा मोठा भाऊ शिकवणीसाठी गेला होता. आई बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे श्रुती घरी एकटीच होती. तिने घरातील पंख्याला गळफास घेतला. काही वेळा नंतर कुटुंबीय घरी आले असता दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजविल्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्याने बाजूच्यांना हा प्रकार सांगण्यात आला. त्यांनी अखेर दरवाजा तोडला. त्यावेळी श्रुती फासावर लटकलेली दिसून आली. तिला तात्काळ उपचारासाठी घाटीत नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी कुठलीही चिठ्ठी सापडली नसल्याने श्रुतीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रुती ही सरस्वती भुवनमध्ये शिकत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

दुसNया घटनेत पाचोडजवळील एकोड येथील लक्ष्मण कल्याण गोजे हा शहरातील एमआयटी महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षात शिकत होता. अभ्यासक्रमाच्या दोन विषयांत तो नापास झाला. यामुळे त्याला नैराश्य आले होते. यातच तो बुधवारी घरातून निघून गेला होता. तो घरी न आल्याने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार रात्री दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लक्ष्मणचे वडील कल्याण गोजे आणि भाऊ हनुमान गोजे सकाळी शेतात गेले. यावेळी त्यांना शेतातील शेततळ्यात मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. दोघांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. यावेळी लक्ष्मणने शेततळयात उडी घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.