भरधावपणा बेतला जीवावर; दुचाकी दुभाजकाला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

accident

पुण्यामध्ये दुचाकीचा भरधावपणा एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. भरधाव दुचाकी पावसामुळे घसरुन दुभाजकाला धडकली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 6 सप्टेंबरला कर्वेनगर उड्डाणपूलावर घडली होती. मात्र, तरुणाचा शवविच्छेदन अहवाल उशिरा मिळाला आहे. हा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनोद पुनाराम चौधरी (वय 26, रा. किश्किंदानगर, कोथरुड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद 6 सप्टेंबरला रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन वेगात कर्वेनगर उड्डाणपूलावरुन जात होता. त्यावेळी पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने विकासची दुचाकी घसरून दुभाजकाला धडकली. या अपघातत गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या