हुकूमशाहीचा अंत व्हायची वेळ आता आलेली आहे, उद्धव ठाकरेंचा ठाम विश्वास

अब की बार भाजप तडीपार हा नारा मी दिलेला आहे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकूमशहा कितीही मोठा तरी ज्या वेळेला सगळे एकवटतात तेव्हा हुकूमशहाचा अंत होतो. ही वेळ आता आलेली आहे, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या अखेरच्या टप्प्यावर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सभा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राहुलजी, तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. कारण तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रात आणि मुंबईत करत आहात. हीच ती मुंबई आहे, ज्या मुंबईतून महात्मा गांधींनी 1942 साली इंग्रजांना चले जाव म्हटलं होतं. आज लोकशाही मारण्यासाठी जी दिल्लीत हुकूमशाही टपलेली आहे, तिला तडीपार करण्यासाठी आपण शिवाजी पार्क निवडलं, त्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो. भाजप हा एक फुगा आहे. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते, त्या फुग्यात आम्ही हवा भरली आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांना सीट्सविषयी विचारलं तर सांगतात चारसौ पार. काय खुर्च्या बनवताय की फर्निचरचं दुकान काढताय? असा शेलका प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा उसळला.

इंडिया आघाडीच्या या लढाईविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढाईसाठी देशभरातून महत्त्वाचे नेते इथे आलेत. आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात असेल तर असं नाहीये. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हीच परिस्थिती आहे. आम्ही जेव्हा इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदींनी सांगितलं की विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही हुकुमशाहीचे विरोधक आहोत. जेव्हा मोदी तुम्ही आमच्या घराणेशाहीचे आरोप करता, तेव्हा तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची इतकाच तुमचा परिवार आहे. ही लढाई लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची आहे. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे, याची सुरुवात नेहमी कोर्टापासून करा. कोर्टात जेव्हा एखादा साक्ष द्यायला येतो, तेव्हा तो त्याच्या धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतो. ते बाजूला करा आणि देशाच्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या, हे त्या घटनेचं महत्त्व आहे. त्यांना 400 पार त्याचसाठी हवंय हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांचे मंत्री आनंदकुमार हेगडेच बोलले की आम्हाला घटना बदलायची आहे. म्हणून 400 पार हवं आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले.

भाजपच्या हुकूमशाहीवरही त्यांना यावेळी आसूड ओढले. ‘रशियातही सध्या निवडणुका सुरू आहेत. तिथे फक्त पुतीनच उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात कुणीच नाही. जे विरोधक होते, त्यातले काही तुरुंगात आहेत किंवा तडीपार केलेले आहेत. लढायलाच कुणी नाही. पण दाखवतात कसं की मी लोकशाही मानतो. बघा मी निवडणूक घेतली पण समोर कुणी उभंच नाही तर मी काय करू? अशी परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्या समोर एक वेळ येऊन ठेपली आहे, मी नेहमी सांगतो की देश हाच माझा धर्म. देश वाचला तरच आम्ही वाचू. आपली ओळख व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे, देशाची ओळख ही व्यक्ती असता कामा नये. हे लोक आता जी जाहिरात करताहेत, मोदी सरकार. म्हणजे तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे? हे माझ्या देशाचं नाव आहे. आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले की असं काहीवेळा वाटत होतं की देशासाठी मजबूत सरकार पाहिजे. पण आता अनुभवानंतर कळलंय की युतीच्या सरकारमध्ये चांगलं वातावरण होतं. सगळे एकत्र होतो आणि अटलजींनी उत्तम प्रकारे देशाचं सरकार चालवलं होतं. मग नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी चांगलं सरकार चालवलं. आता हे 2014पासून एका पक्षाचं सरकार आहे. ते सांगताहेत की विरोधी पक्ष 2029मध्ये अडकलाय, पण मी 2047ची गोष्ट करतोय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. आणि या देशाच्या जनतेसमोर हुकूमशहा कितीही मोठा तरी ज्या वेळेला सगळे एकवटतात तेव्हा हुकूमशहाचा अंत होतो. ही वेळ आता आलेली आहे.’ असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास जर का तोडा फोडा आणि राज्य करा असा असेल, तर आपल्यात फूट पाडणाऱ्याला तोडा, फोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. अबकी बार भाजप तडीपार हा नारा मी देतोय. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. हातात मशाल घेऊन रणशिंग आपल्याला फुंकायचं आहे. मुंबईतून जेव्हा एखादी घोषणा होते, तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो. म्हणून लोकशाही रक्षणाच्या लढाईची सुरुवात होत आहे. ज्यांना फोडलंत ती देशाची जनता नाही. देशाची जनता आमच्यासोबत आहे. तुम्ही कितीही अत्याचार करायचा प्रयत्न करा. तुम्हाला तोडूनमोडून टाकण्याची शपथ घेऊन मैदानात उतरलो आहोत.’ असा वज्रनिर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.