
सामना प्रतिनिधी । नाशिक
अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी एकत्र या असे निमंत्रणच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपला दिले. दिवाळी म्हणजे फटाके वाजवायलाच हवे. पण मला फटाके वाजवायला दिवाळीची गरज नाही, ते मी रोजच वाजवत असतो असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणताच प्रचंड हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेना आणि भाजपचे मंत्री उपस्थित होते. त्याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे म्हणाले, अनेकांना आश्चर्य वाटत असेल की हे सगळे एकत्र कसे आले? (हंशा). आपण या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी जसे एकत्र आलो, तसेच अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनासाठीही एकत्र यावे. तोसुद्धा दिवस आलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी घरे पेटवणारा नाही!
मी घरे पेटवणारा नाही तर चुली पेटवण्याकडे माझे जास्त लक्ष असते असे ठामपणे बजावतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण शेतकरी म्हणतात, कर्जमाफी झालीच नाही. मग पात्र-अपात्रतेचे निकष त्यांच्या आड आलेत का हे पाहणे सरकारचे काम आहे. मी सरकारवर टीका करत नाही तर जनतेच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो.
शेतकऱ्यांच्या जखमेतील रक्ताचा रंग ‘लाल’ होता
शेतकऱ्यांचा संपात खांद्याला खांदा लावून शिवसेना उतरली होती. याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले, नाशिकहून कम्युनिस्टांचा शेतकरी मोर्चा मुंबईत आला तेव्हा त्या मोर्चाचे स्वागत केले. त्यावर टीकाही झाली. पण शेतकऱ्यांचे स्वागत करताना त्यांच्या खांद्यावरील निशाणाचा ‘लाल’ रंग नाही तर अनवाणी चालताना त्यांच्या पायातून जे रक्त येत होते त्या रक्ताचा ‘लाल’ रंग मला दिसला होता. म्हणून मी त्यांचे स्वागत केल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.यावेळी भाजप नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री सुभाष भामरे या भाजप मंत्र्यांसह आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि आमदार, खासदारांसह जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते.
जे पटत नाही ते सांगणे ही आमची घराणेशाही
मी सगळ्यांच्या साक्षीने विचारतोय की गेल्या साडेचार वर्षांत मी कधी सरकारच्या चांगल्या कामात खोडा घातला आहे का? कधीच घातला नाही आणि घालणारही नाही. हे पाप माझ्याकडून होणार नाही. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणार. पण जे पटत नाही ते आपल्या भाषेत सांगणे ही आमची घराणेशाही आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पाण्यावरून जोडे खाण्यापेक्षा माणसे जोडा!
दुष्काळ भीषण आहे. कधी नव्हे ते कोकणातील काही तालुकेही दुष्काळाने होरपळतायत. एका बाजूला आपण सोयीसुविधा वाढवतोय पण नैसर्गिक संकटे आपला पाठलाग सोडत नाहीत अशी स्थिती असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य म्हटले की हक्काच्या पाण्याचा विषय आलाच. पाणी प्रश्नावरून जोडे खाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन माणसे जोडा. त्यांचे गैरसमज दूर करा. नदीजोड प्रकल्पासाठी समुद्रात जाणारे पाणी उलटे फिरवू शकतो का, त्यासाठी उपाययोजना आहे का? असेल तर मग राजकारण गेले चुलीत. जनतेच्या हितासाठी सरकार कुणाचेही असले तरी त्याला मी पाठिंबा देणारच असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मराठा आरक्षण अहवाल 15 नोव्हेंबरला
10 ते 15 नोव्हेंबरच्या आसपास मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल, त्यानंतर कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यात येईल, असे सार्वजनकि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भीमा-कोरेगावच्या दंगलीत आणि मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या तरुणांवरील केसेस सरकारने मागे घेतल्या आहेत. जेथे दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झाले आहे ते गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. याबाबतचा जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच काढला आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

























































